शैक्षणिक पात्रता पतीपेक्षा जास्त; पत्नीची पोटगीची मागणी फेटाळली | पुढारी

शैक्षणिक पात्रता पतीपेक्षा जास्त; पत्नीची पोटगीची मागणी फेटाळली

पुणे : पत्नी सध्या कमवत नाही. मात्र, तिची शैक्षणिक पात्रता पतीपेक्षा जास्त आहे. तिला आर्थिक साहाय्याची गरज नाही. शिक्षणाच्या जोरावर नोकरी करून ती उदरनिर्वाह करू शकते, असा निष्कर्ष काढत पत्नीने पोटगीसाठी केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळला. पुणे येथील वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश प्रगती येरलेकर यांनी हा निकाल दिला. प्रभाकर आणि विभावरी (नावे बदलली आहेत) अशी दोघांची नावे आहेत. त्याचे शिक्षण बी. ई. इंजिनिअरींग झाले आहे. तर तिचे बी.सी.ए., बी.एस्सी., लॅब टेक्निशियन असे शिक्षण झाले आहे.

या प्रकरणात विभावरी हिने प्रभाकर याकडे दरमहा 25 हजार रुपये पोटगी देण्याची मागणी केली होती. त्यास प्रभाकर याच्या वतीने अ‍ॅड. विकास मुसळे यांनी विरोध केला. नोकरी करत नसल्याचे तिचेही म्हणणे आहे. मात्र, हे म्हणणे संशयास्पद वाटते. तिने न्यायालयात बँकेचे विवरणपत्र दाखल केले नाही. विभावरीची शैक्षणिक पात्रता उच्च असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर न्यायालयाने हा निकाल दिला.

याखेरीज, आपण नाशिक जिल्ह्यातील येवला येथे बहिणीकडे राहत असून, सुनावणीसाठी पुण्यात यावे लागते. उत्पन्नाचे कोणतेही साधन नसून महिला असल्याने सोबतीला कोणाला तरी आणावे लागते. त्यामुळे दर तारखेला 3 हजार रुपये प्रवासखर्च देण्याची मागणी तिने न्यायालयात केली. मात्र, तिने बाहेरगावहून येत असल्याचा ठोस पुरावा दिलेला नाही. तिकिटे जोडली नाहीत, हे अ‍ॅड. मुसळे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

हेही वाचा

Back to top button