

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्यातील यंदाच्या दुष्काळीस्थितीत उसाच्या नव्याने होणार्या लागवडीत घट होत असल्याच्या पार्श्वभूमीवर उसाच्या खोडवा, निडव्याचे योग्य व्यवस्थापन व्हायला हवे. कारण पुढील वर्षी म्हणजे हंगाम 2024-25 मध्ये साखर कारखान्यांना गाळपासाठी उसाची उपलब्धता यंदाच्या 1022 लाख टनांवरून घटून 600 ते 650 लाख टनाइतकीच राहण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे पुढील हंगाम शंभर दिवसांच्या आतच संपू शकतो, असे सूतोवाच दि डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशनच्या (डीएसटीए) चर्चासत्रात करण्यात आले. शिवाजीनगर येथील डीएसटीएच्या मुख्यालयात आयोजित 'दुष्काळामुळे घटलेल्या ऊसलागवडीमुळे खोडवा, निडव्याचे नियोजन' या विषयावर लालचंद हिराचंद सभागृहात आयोजित चर्चासत्रात उपस्थित मान्यवरांनी शक्यता वर्तविली.
संबंधित बातम्या :
डीएसटीएसह राज्य सहकारी साखर कारखाना संघ, वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (विस्मा) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित चर्चासत्रास महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. योगेंद्र नेरकर, साखर संघाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ, ऊस पैदासकार व डीएसटीएच्या कृषी समितीचे सह निमंत्रक डॉ. सुरेश पवार, कृषिरत्न डॉ. संजीव माने, डीएसटीआयचे शास्त्रज्ञ डॉ. बाळकृष्ण जमदग्नी, डॉ. निळकंठ मोरे, डॉ. भरत रासकर आदी उपस्थित होते. साखर कारखान्यातील उपस्थित शेती अधिकारी आणि कृषी क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित केलेल्या शंकांचे निरसन करण्यात आले.
या वेळी खताळ म्हणाले, पुढील वर्षी राज्यातील उसाचे उत्पादन 600 ते 650 लाख टनांपर्यंत खाली आल्यास ऊसगाळप हंगामाचा कालावधीही त्यानुसार 70 दिवसांपेक्षा जास्त दिवस चालू शकणार नाही. चालू हंगामापेक्षाही पुढील हंगामातील ऊस उपलब्धतेची स्थिती सध्याच्या दुष्काळामुळे आत्ताच प्रकर्षाने दिसू लागली आहे. ठिबक, तुषार व इतर तंत्र वापरून ऊस उत्पादकता टिकवावी लागेल. उसाचे खोडवे, निडवे ठेवण्यासाठी शेतकर्यांना विश्वासात घ्यायला हवे. पुढील हंगामात ऊस उपलब्धता घटण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व साखर कारखान्यांनी दक्ष राहून उसाचा खोडावा, निडवा व्यवस्थापनाला महत्त्व द्यायला हवे, अशी अपेक्षा डॉ. नेरकर यांनी व्यक्त केली.
डॉ. सुरेश पवार म्हणाले, राज्यातील पाच दुष्काळी स्थितीचा मी साक्षीदार आहे. प्रत्येक दुष्काळात साखर उद्योगाला खोडव्यानेच तारले आहे. पुढील वर्षी उसाची अतिटंचाई तयार होईल. त्यामुळे शेतकर्यांना खोडवा ऊस ठेवण्यासाठी कारखान्यांनी योग्य मार्गदर्शन केल्यास पुढील हंगामात ऊस उपलब्धता वाढेल.