Pune : थोपटेवाडी रेल्वे फाटकामध्ये बिघाड | पुढारी

Pune : थोपटेवाडी रेल्वे फाटकामध्ये बिघाड

वाल्हे : पुढारी वृत्तसेवा : पुणे-पंढरपूर पालखी महामार्गावरील पुणे-मिरज लोहमार्गावर वाल्हे-निरादरम्यान असलेले थोपटेवाडी (ता. पुरंदर) हद्दीतील रेल्वे फाटकात गुरुवारी (दि. 14) सायंकाळी बिघाड झाला होता. त्यामुळे दोन्ही बाजूंना सुमारे दीड किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या. अगोदरच अरुंद रस्ता, दुतर्फा सुरू असलेले पुणे-पंढरपूर पालखी महामार्ग रुंदीकरणाचे काम अन् त्यातच झालेल्या वाहतूक कोंडीने ऐन रहदारीच्या वेळी चालकांसह प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. पुणे-पंढरपूर पालखी महामार्ग रुंदीकरणाचे काम वेगात सुरू आहे. मात्र, पिसुर्टी गावापासून निरापर्यंतचे रुंदीकरण अद्यापी प्रलंबित आहे. हा मार्ग पूर्वीप्रमाणेच राहणार असल्याचे बांधकाम विभागाने सांगितले आहे. याच मार्गावर पुणे-मिरज रेल्वे मार्गाचे रेल्वे फाटक क्रमांक 27 किलोमीटर 79/01 आहेत. या रेल्वे फाटकांमध्ये मागील काही दिवसांपासून सतत बिघाड होत आहे. गुरुवारी सायंकाळीदेखील यातील एक रेल्वे फाटक नादुरुस्त झाले.

संबंधित बातम्या :

वाल्हे बाजूकडील फाटक लागून राहिले, तर निरा बाजूकडील फाटक उघडेच राहिले. त्यामुळे वाहने अडकून पडली. परिणामी, ऐन रहदारीच्या वेळी चालकांसह प्रवाशांचे मोठे हाल झाले. देशभरात रेल्वेने रेल्वे फाटकविरहित रेल्वे क्रॉसिंग अशी संकल्पना राबविण्यास सुरुवात केली आहे. मात्र, पुणे-पंढरपूर पालखी मार्गावरील वाल्हे ते निरा दरम्यानच्या पिसुर्टी रेल्वे गेटवर आजही जुन्या काळातील रेल्वे फाटक व आता सिक्युरिटी एजन्सीचे कर्मचारी नेमले आहेत. या ठिकाणी रेल्वेचे कर्मचारी नसल्याने काही बिघाड झाल्यास, दुरुस्ती करण्यास अडथळा निर्माण होत आहे.

रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष
मागील आठवड्यात याच रेल्वे फाटकामध्ये एक डंपर शिरला होता. रेल्वे फाटक लागलेले असताना भरधाव डंपर थेट फाटकाचे दांडके तोडून लोहमार्गावर आडवा झाला होता. त्या वेळीही रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या रेल्वे फाटकांमधील दोन्ही लोहमार्गावरून अनेक दुचाकीस्वार घसरून पडत आहेत. रेल्वे प्रशासन मात्र याकडे गांभीर्याने पाहत नसल्याने प्रवाशांकडून नाराजी व्यक्त होत आहे.

Back to top button