

पुणे : कोरेगाव भीमा येथे शौर्यदिनी विजयस्तंभ मानवंदना देण्यासाठी लाखो अनुयायी येतात. त्यांना भोजन देण्यात येणार आहे. हे जेवण दिनविशेष खर्चातून देण्यात यावे, असे आदेश शासनाने दिले आहेत, अशी माहिती बार्टीचे महासंचालक सुनील वारे यांनी दिली.
अनुयायांना जेवण देण्यासाठी 60 लाखांची उधळपट्टी करू नये, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृतीमधून खर्च करू नये. यासाठी दोन दिवसांपासून सोशल मीडिया आणि विविध संघटनांनी टीका केली होती. त्यावर आता पडदा पडला असून, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जेवण देण्यात येणार आहे. कोरेगाव भीमा येथे शौर्यदिनाचे औचित्य साधून राज्याच्या विविध भागांसह देशभरातून लाखो अनुयायी येतात.
त्यांना बार्टीच्या वतीने जेवण उपलब्ध करून दिले जाते. त्यासाठी शासनस्तरावरून दिनविशेष उपक्रमातून विशेष अनुदान दिले आहे. शासनाच्या निर्देशानुसार भोजन दिले जाते. याचा खर्च बार्टीतील यूपीएससी, एमपीएससी, आयबीपीएस, फेलोशिप, पीएचडी, विद्यार्थी शिष्यवृत्ती, विद्यावेतन निधीच्या योजनेतील नाही. तो 20 डिसेंबर 2022 च्या शासन निर्णयानुसार शौर्यदिन साजरा करण्याकरिता वेगळा दिला जातो. याबाबत शासनाने बार्टीचे महासंचालक यांना तातडीची बाब लक्षात घेऊन उपलब्ध करून द्यावा, असे निर्देश सामाजिक न्याय व विशेष विभागाने दिलेले आहेत.
दरम्यान, समाजातील काही पक्ष, संघटनांनी बार्टी मार्फत देण्यात आलेली भोजन निविदा तत्काळ रद्द करावी, अशी मागणी केली होती. तर या अनुयायांना भोजनाची व्यवस्था असावी, असा आग्रह भीमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्यदिन समन्वय समितीचे अध्यक्ष राहुल डंबाळे, रिपाईचे अध्यक्ष सतीश गायकवाड, आम्ही सावित्रीच्या लेकी संघटनेच्या रंजना कांबळे, मानसी वानखेडे यांच्यासह आंबेडकरी पक्ष व संघटनांनी बार्टीकडे केला होता.
बार्टी दिनविशेष कार्यक्रमांतर्गत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे व इतर महामानवांच्या जयंती व पुण्यतिथी व महत्त्वपूर्णदिनी दिनविशेषदिनी अभिवादन करून महामानवांच्या विचारांचा प्रचार व प्रसार केला जातो. विविध पक्ष संघटनांच्या मागणीनुसार 50 हजार अनुयायांना शौर्यदिनी शासनाच्या निर्देशानुसार भोजन पॅकेट वाटप करण्यात येणार असल्याची माहिती बार्टीचे महासंचालक सुनील वारे यांनी दिली.
हेही वाचा