सतरा हजार शेतकर्‍यांना अवकाळीचा फटका | पुढारी

सतरा हजार शेतकर्‍यांना अवकाळीचा फटका

शिवनेरी : पुढारी वृत्तसेवा : नोव्हेंबर महिन्यात 26 ते 28 दरम्यान झालेला अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शिरूर कृषी विभागातील जुन्नर, आंबेगाव, खेड आणि शिरूर या 4 तालुक्यांत तब्बल 6 हजार 818 हेक्टरवरील पिकांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळेच 17 हजार 237 शेतकरी बाधित झाले आहे. हा नुकसानीचा अहवाल राज्य शासनाला पाठविण्यात आला आहे. सध्या नागपूरला सुरू असलेल्या अधिवेशनात या नुकसानीबाबत शासनाकडून घोषणा होण्याची शक्यता आहे. नोव्हेंबर महिन्यात अखेरच्या आठवड्यात संपूर्ण पुणे जिल्ह्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला.

संबंधित बातम्या :

खरिपाची पिके काढणीला आली असताना व रब्बीच्या पेरण्या सुरू असताना या अवकाळी पाऊस व गारपिटीचा फटका बसला. दोन दिवस झालेल्या पावसाने शिरूर कृषी विभागातील 6 हजार 818 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये काढणीला आलेला भात, बटाटा, ज्वारी, कांदा, मका, भाजीपाला, द्राक्षबागांचे मोठे नुकसान झाले. तर रब्बी हंगामातील पेरलेली पिकेदेखील पाण्याखाली राहिल्याने नुकसान झाले. विभागात सर्वाधिक फटका आंबेगाव व शिरूर तालुक्यांतील शेतकर्‍यांना बसला आहे. अवकाळी पावसाने 17 हजार शेतकर्‍यांची पिके उद्ध्वस्त झाली आहेत. यामुळेच शासनाने तातडीने मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

शिरूर कृषी विभागातील सर्व तालुक्यांत अवकाळी पावसाचे पंचनामे करून नुकसान झालेल्या क्षेत्राची व शेतकर्‍यांची पीकनिहाय माहिती गोळा करण्यात आली. याबाबतचा अंतिम अहवाल जिल्हा प्रशासनाला पाठविण्यात आला आहे. या संदर्भात शासनाकडून काही मदत व मार्गदर्शक सूचना येतील, तशी पुढील कारवाई करण्यात येईल.
                                       – सतीश शिरसाठ, कृषी अधिकारी, शिरूर उपविभाग.

Back to top button