Pune News : धरणग्रस्तांचे धरणेआंदोलन मागे

Pune News : धरणग्रस्तांचे धरणेआंदोलन मागे

वडगाव मावळ : पुढारी वृत्तसेवा : मावळ तालुक्यातील धरण ग्रस्तांचे पुनर्वसन, शेतीला पाणी, टाटा धरणग्रस्तांच्या विविध मागण्यांसाठी सहकार महर्षी माऊली दाभाडे यांच्या नेतृत्वाखाली आज पुणे जिल्हा किसान युनियनच्या वतीने वडगाव मावळ येथे सुरू करण्यात आलेले बेमुदत धरणेआंदोलन जिल्हा पुनर्वसन अधिकार्‍यांनी दिलेल्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आले. आंदोलनास माजी सभापती गणपतराव शेडगे, भारत ठाकूर, बबनराव भोंगाडे, संभाजी शिंदे, विलास मालपोटे, शांताराम लष्करी, दत्तात्रय आंद्रे, रविकांत रसाळ, माऊली ठाकर, संभाजी राक्षे, तुकाराम ढोरे, रोहिदास म्हसे, नारायण ठाकर, नामदेव दाभाडे, नितीन बोडके आदी शेतकरी उपस्थित होते.

पवना व आंद्रा धरणग्रस्तांचे पुनर्वसन झाले पाहिजे, टाटा धरण प्रकल्पात गेलेल्या जमिनीवर जे शेतकरी त्या कसत आहेत त्या जमिनी शेतकर्‍यांच्या नावावर झाल्या पाहिजे, बंद जलवाहिनी प्रकल्पाचे पाणी जात असताना पवना धरणाच्या उजव्या व डाव्या बाजूकडील 21 गावांना बंद पाईप मधुन शेतीला पाणीपुरवठा करावा, उसाला दिलेला 2800 रुपये भाव रद्द करून प्रतिटन 3300 रुपये भाव मिळावा, वडिवळे डाव्या व उजव्या कालव्यातून 8 महिने शेतीला पाणी द्यावे आदी मागण्यासाठी हे धरणे आंदोलन करण्यात आले.

दरम्यान, जिल्हा पुनर्वसन अधिकारी विवेक जाधव, तहसीलदार विक्रम देशमुख, अपर तहसीलदार अजित दिवटे, पोलिस निरीक्षक कुमार कदम यांनी आदोलनकर्त्याची भेट घेऊन चर्चा केली. पवना व आंद्रा धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबत आजच पुनर्वसन मंत्र्यांकडे प्रस्ताव पाठवून यासंदर्भात मंत्रिस्तरावर बैठक घेण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन पुनर्वसन अधिकारी जाधव यांनी दिले.
याशिवाय पवना व वडीवळे धरणातून कालव्याद्वारे शेतीला पाणी देण्याबाबत पाटबंधारे खात्याशी चर्चा करून निर्णय घेणे व इतर मागण्यांबाबतही सबंधित अधिकार्‍यांशी तात्काळ संपर्क साधून कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्यानंतर धरणेआंदोलन मागे घेण्यात आले.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news