Pune News : विद्यापीठाकडून पुढील वर्षापासून डिप्लोमा कोर्स बंद | पुढारी

Pune News : विद्यापीठाकडून पुढील वर्षापासून डिप्लोमा कोर्स बंद

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ‘सर्टिफिकेट कोर्स’ आणि ’पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा’ अभ्याक्रमांच्या संपूर्ण आराखड्यात आमूलाग्र बदल केले असून, त्याची अंमलबजावणी पुढील शैक्षणिक वर्षापासून होणार आहे. त्यामुळे या अभ्यासक्रमांऐवजी पुढील शैक्षणिक वर्षापासून महाविद्यालयांना बारावी उत्तीर्णांसाठी ’फाउंडेशन कोर्स’, तर पदवीधरांसाठी ’अ‍ॅडव्हान्स्ड कोर्स’ सुरू करता येईल. त्यामुळे पुढील शैक्षणिक वर्षापासून ’डिप्लोमा कोर्स’ बंद केले जाणार आहेत.

विद्यापीठाच्या शैक्षणिक विभाग आणि महाविद्यालयांकडून कौशल्य विकासासाठी विविध सर्टिफिकेट, डिप्लोमा आणि अ‍ॅडव्हान्स्ड डिप्लोमा अभ्यासक्रम अ‍ॅडऑन कोर्सेस म्हणून चालविले जातात. पुणे विद्यापीठाच्या अधिकार मंडळाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी सध्याचे सर्व प्रमाणपत्र, प्रगत प्रमाणपत्र, पदविका व पदव्युत्तर पदविकाचे नामाभिधान (नोमेनक्लेचर), श्रेयांक, कालावधी आदींबाबत धोरण ठरविण्यासाठी डॉ. मनोहर चासकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती. या समितीचा अहवाल 2024-25 या शैक्षणिक वर्षापासून लागू करण्याला विद्यापीठाने मान्यता दिली आहे.

त्यानुसार सर्टिफिकेट कोर्सऐवजी यापुढे फाउंडेशन कोर्स सुरू करता येणार आहे. पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमाऐवजी, अ‍ॅडव्हान्स्ड कोर्स सुरू करता येणार आहे, असे विद्यापीठाकडून सांगण्यात आले आहे. या निर्णयानुसार विद्यापीठाचे विभाग, सर्व संलग्न महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त संस्थांना सध्या अस्तित्वात असलेले सर्व प्रमाणपत्र, प्रगत प्रमाणपत्र, पदविका व पदव्युत्तर पदविकाचे नोमेनक्लेचर, श्रेयांक, कालावधी, अभ्यासक्रम आदींची माहिती 30 डिसेंबरपर्यंत अद्ययावत करायची आहे.

त्यासाठी विद्यापीठाने सुविधा उपलब्ध करून दिली आहे. विद्यापीठाने दिलेल्या मुदतीत माहिती अद्ययावत न केल्यास पुढील शैक्षणिक वर्षापासून अशा अभ्यासक्रमाला मान्यता मिळणार नाही, अशा सूचना विद्यापीठ प्रशासनाने दिल्या आहेत. या निर्णयामुळे महाविद्यालयांकडून सुरू होणार्‍या ’अ‍ॅडऑन कोर्सेस’ला व्यवस्थित स्वरूप मिळणार आहे.

नाव पात्रता क्रेडिट कालावधी तास गुण

फाउंडेशन कोर्स 12वी उत्तीर्ण 0-22 एक वर्षापर्यंत 15 तास एका क्रेडिटसाठी 25 गुण एका क्रेडिटसाठी
अ‍ॅडव्हान्स्ड कोर्स पदवी उत्तीर्ण 0-44 एक ते दोन वर्षे 15 तास एका क्रेडिटसाठी 25 गुण एका क्रेडिटसाठी

चार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमाचे नोमेनक्लेचर

  • नोमेनक्लेचर कालावधी क्रेडिट्स
  • प्रमाणपत्र एक वर्ष 20 ते 22
  • डिप्लोमा दोन वर्षे 80 ते 88
  • पदवी तीन वर्षे 120 ते 132
  • पदवी (ऑनर्स किंवा रिसर्च)
  • चार वर्षे 160 ते 176

हेही वाचा

Back to top button