पीक विमा उतरविण्यात शेतकर्‍यांचा सहभाग वाढला  | पुढारी

पीक विमा उतरविण्यात शेतकर्‍यांचा सहभाग वाढला 

 पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्यात चालू रब्बी हंगाम 2023-24 मध्ये 63 लाख 71 हजार शेतकर्‍यांनी योजनेत सहभाग घेत सुमारे 43 लाख 35 हजार हेक्टरवरील पिकांचा विमा उतरविला आहे. गतवर्षीच्या तुलनेत तब्बल 56 लाख 26 हजार शेतकर्‍यांचा योजनेत सहभाग वाढला असून विमा क्षेत्रही  ३८ लाख  हेक्टरने वाढले आहे.  केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेत शेतकरी एक रुपया भरुन सहभागी होत आहेत. तसेच शेतकर्‍यांमध्ये पीक विम्याबाबत निर्माण झालेली जागृकता आणि विमा रक्कमही मिळत असल्यामुळे ही स्थिती आहे.
शिवाय अवकाळी पाऊस, गारपिट, अतिवृष्टी, पावसातील खंड या हवामान बदलामुळे पिकांच्या उत्पादनावर विपरित परिणाम होऊन शेतकर्‍यांना नुकसानीस सामोरे जावे लागते. या स्थितीत शेतकर्‍यांना पीक विम्याचा मोठा आधार मिळत असल्याने शेतकर्‍यांचा कल पीक विमा उतरविण्यात वाढला असल्याची माहिती कृषी विस्तार सह संचालक विनयकुमार आवटे यांनी दिली. ते म्हणाले गत आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये रब्बी हंगामात 15 डिसेंबर 2022 अखेर केवळ 7 लाख 45 हजार शेतकर्‍यांनी ५  लाख ३४ हजार हेक्टरवरील पिकांचा विमा योजनेतून उतरविला होता.
हेच प्रमाण 13 डिसेंबर 2023 रोजी लक्षणीयरित्या वाढल्याचे दिसून आले आहे. सद्यस्थितीत 63 लाख 71 हजार शेतकर्‍यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होत 43 लाख 35 हजार हेक्टरवरील पिकांसाठी पीक विमा उतरविला आहे. पीक विमा योजनेचे महत्व या निमित्ताने अधोरेखित झाले असल्याचे स्पष्ट होत आहे.

विमा सहभागाचे शेवटचे 2 दिवस…

रब्बी हंगामातील हरभरा, गहू आणि कांदा पिकासाठी पीक विमा योजनेत सहभागी होण्याचा अंतिम दिनांक 15 डिसेंबर आहे. त्यामुळे शेवटच्या दोन दिवसांत इच्छुक शेतकर्‍यांनी तत्काळ पीक विमा योजनेत सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. तर उन्हाळी भात आणि उन्हाळी भुईमूगासाठी 31 मार्च 2024 पर्यंत विमा योजनेत सहभागी होता येईल.

एकूण विमा हप्ता 1863 कोटी रुपये…

रब्बी हंगामातील पीक विमा सहभागापोटी शेतकर्‍यांनी एक रुपयाप्रमाणे 63 लाख 71 हजार 508 रुपये जमा केले आहेत. यामध्ये राज्य सरकारचा 1100 कोटी रुपये आणि केंद्र सरकारचा हिस्सा 761 कोटी रुपये मिळून एकूण विमा हप्त्याची रक्कम 1 हजार 863 कोटी रुपये असल्याचेही आवटे यांनी सांगितले.
हेही वाचा

 

Back to top button