बारामती : पुढारी वृत्तसेवा : चेन्नई येथील प्राईम पॉइंट फाउंडेशन आणि इ- मॅगॅझीनतर्फे दर पाच वर्षांनी देण्यात येणारा संसद महारत्न पुरस्कार राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना दुसर्यांदा जाहीर झाला आहे. 17 फेब्रुवारी 2024 रोजी दिल्ली येथे त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. लोकसभेतील उपस्थिती, जनहिताचे उपस्थित केलेले प्रश्न, चर्चेतील सहभाग, खासगी विधेयक आणि अनुकरणीय सर्वोत्तम कामगिरीसाठी खा. सुळे यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
संबंधित बातम्या :
ज्युरी कमिटीचे अध्यक्ष व केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल, सहअध्यक्ष व निवडणूक आयोगाचे माजी अध्यक्ष टी. एस. कृष्णमूर्ती यांनी सुळे यांची या पुरस्कारासाठी निवड केली. यापूर्वी सोळाव्या लोकसभेतील कामगिरीसाठीसुद्धा त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. लोकसभेत उत्कृष्ट कामगिरी करणार्या खासदारांना प्राईम पॉइंट फाउंडेशनतर्फे हा पुरस्कार देण्यात येतो. माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या संकल्पनेतून हा पुरस्कार सुरू करण्यात आला आहे, असे फाउंडेशनचे के. श्रीनिवासन यांनी कळविले आहे.
94 टक्के उपस्थिती, 231 चर्चासत्रांत भाग
सतराव्या लोकसभेत सुळे यांनी 5 डिसेंबर 2023 अखेरपर्यंत 94 टक्के उपस्थिती लावत 231 चर्चासत्रांत भाग घेतला. सभागृहात त्यांनी आतापर्यंत 587 प्रश्न विचारले असून, 16 खासगी विधेयके मांडली आहेत. या कामगिरीसाठी त्यांना पुन्हा एकदा संसद महारत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. याच संस्थेचा संसदरत्न पुरस्कार त्यांना सात वेळा प्रदान करण्यात आला आहे.