ज्ञानेश्वरांनी सामान्यांच्या भाषेत समाजप्रबोधन केले : डॉ. सुरेश गोसावी | पुढारी

ज्ञानेश्वरांनी सामान्यांच्या भाषेत समाजप्रबोधन केले : डॉ. सुरेश गोसावी

पुणे : पुढारी वृत्तसेवा : ‘महाराष्ट्र हा संतांचा देश आहे. लोकसेवेचे महान मंदिर संतांनी या महाराष्ट्रात उभारले. त्याचा पाया उभारण्याचे महत्त्वाचे काम संत श्रीज्ञानेश्वरांनी केले तसेच ज्ञानेश्वरांनी सामान्यांना कळेल, अशा भाषेत गीता, ओव्या लिहून समाजप्रबोधनाचे काम केले,’ असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी व्यक्त केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात संत श्रीज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी डॉ. गोसावी बोलत होते. या वेळी प्र- कुलगुरू डॉ. पराग काळकर, प्रभारी कुलसचिव डॉ. विजय खरे, या कार्यक्रमाचे व्याख्याते आणि संत ज्ञानदेव अध्यासनाचे शैक्षणिक सल्लागार डॉ. ओमश्रीश श्रीदत्तोपासक, वित्त व लेखा अधिकारी चारुशीला गायके, तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख  डॉ. आदित्य अभ्यंकर आदींनी संत श्रीज्ञानेश्वर महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या कार्यक्रमाचे व्याख्याते आणि संत ज्ञानदेव अध्यासनाचे शैक्षणिक सल्लागार डॉ. ओमश्रीश श्रीदत्तोपासक म्हणाले, ‘माउलीने आपल्याला काय दिले? तर माउलीने आपल्याला माणूसपणाची जाणीव करून दिली, जी आजच्या काळात खूप महत्त्वाची आहे. आज आपण मराठी ही अभिजात भाषा व्हावी म्हणून जो संघर्ष करतोय, त्यासाठी आपल्याला आपल्या मातृभाषेप्रतीचा जो अभिमान लागतो, तो संत श्रीज्ञानेश्वर महाराजांनी ‘माझा मराठीची बोलू कौतुके। परि अमृतातेहि पैजा जिंके॥’ या ओवीतून दिला,’ असेही ते म्हणाले.

हेही वाचा

Back to top button