Pune News : तहानलेल्या लोहगावकरांचा पाण्यासाठी टाहो!

Pune News : तहानलेल्या लोहगावकरांचा पाण्यासाठी टाहो!
Published on
Updated on
धानोरी : महापालिकेत समाविष्ट होऊन काही वर्षे उलटल्यानंतरही लोहगावकरांना हक्काच्या पिण्याच्या पाण्यासाठी लाखो रुपये खर्च करावे लागत आहेत. काही ठिकाणी अद्याप जलवाहिन्या टाकण्याची कामे झालेली नाहीत. तर काही भागात अनियमित व  कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. त्यामुळे टँकरच्या पाण्यासाठी दर महिन्याला आर्थिक भुर्दंड बसत असल्याने परिसरातील सोसायट्यांचे अर्थकारण कोलमडले आहे. लोहगावमधील संतनगर भागात दोन दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे.
लोहगाव-निरगुडी रस्त्यावरील काही ठिकाणी नागरिकांनी स्वखर्चाने जलवाहिनी टाकली आहे. डी. वाय. पाटील कॉलेज – लोहगाव रस्ता व खंडोबा माळ परिसरात जलवाहिनीच नाही. या भागातील नागरिकांना पिण्यासाठी एक रुपया प्रतिलिटर दराने पाणी विकत घ्यावे लागते. काही नागरिक टँकरचे पाणी घरातील वॉटर फिल्टरने शुद्ध करून पिण्यासाठी वापरतात. असे केल्याने भविष्यात नागरिकांना आरोग्याच्या समस्यांचाही सामना करावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टँकर पुरवठादार जोमात अन् रहिवासी कोमात…

दहा हजार लिटरच्या एका टँकरसाठी सहाशे ते एक हजार रुपये मोजावे लागतात. उन्हाळ्यामध्ये हाच भाव सुमारे दीड हजार रुपयांपर्यंत जातो. शंभर सदनिका असलेल्या एका सोसायटीला दिवसाला चार ते पाच टँकर पाणी विकत घ्यावे लागते. सरासरी आठशे रुपये भाव गृहीत धरला तरी दिवसाला चार हजार रुपये खर्च होतो. त्यामुळे महिन्याला घरगुती वापरासाठी लागणार्‍या पाण्यासाठी सुमारे सव्वा लाख रुपये खर्च होतो. अशा शेकडो सोसायट्या व काही लाख लोकसंख्या असलेल्या लोहगावच्या टँकरवरील वार्षिक खर्चाचे गणित काही कोटींमध्ये नक्कीच जाते. त्यामुळे 'टँकर पुरवठादार जोमात आणि रहिवासी कोमात', अशी परिस्थिती झाली आहे.

भाड्याचे घरच बरे!

सोसायट्यात राहणार्‍या नागरिकांना महिन्याला अडीच हजार रुपये देखभाल-दुरुस्तीचा खर्च देऊनही टँकरचा खर्च भागविण्यासाठी अतिरिक्त वर्गणी गोळा करावी लागते. त्यामुळे पोटाला चिमटा घेऊन सदनिका घेण्याऐवजी भाड्याचे घर परवडले, अशी लोहगाव परिसरातील रहिवाशांची अवस्था झाली आहे.
दोन-तीन दिवसांतून एकदाच तासभर पाणी येते. टँकरच्या पाण्यासाठी महिन्याला सुमारे दोन लाख रुपये खर्च होतो. देखभाल-दुरुस्तीची महिन्याची वर्गणी त्यासाठी पुरत नाही. टँकर पुरवठादारांचे थकलेले पैसे भागविण्यासाठी सोसायटीची बैठक बोलवलेली आहे.
-एका सोसायटीचे  व्यवस्थापक, साठेवस्ती परिसर
हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news