पनीर, चिकनपेक्षाही महागडी आहे भाजी | पुढारी

पनीर, चिकनपेक्षाही महागडी आहे भाजी

रायपूर : भारताच्या मध्य भागातील राज्य म्हणून ओळखलं जाणार राज्य म्हणून छत्तीसगडची ओळख आहे. छत्तीसगडमध्ये वनसंपदा मोठ्या प्रमाणात आहे. येथील लोक मोठ्या प्रमाणात भाज्या खातात. तिथल्या भाज्या आणि त्याची चव या विशेष गोष्टी आहेत. साधारणपणे त्या त्या प्रदेशात उपलब्ध होणार्‍या भाज्यांवर तेथील शेतकर्‍यांचे उत्पन्न अवलंबून असतं. छत्तीसगडमध्ये बोहार ही भाजी सर्वाधिक लोकप्रिय आहे. पनीर आणि चिकनपेक्षाही ही भाजी महाग आहे.

वर्षातील काही महिन्यांमध्येच ही भाजी उपलब्ध असते. बोहार भाजीची चव चांगली असल्याने लोक मोठ्या प्रमाणात याची मागणी करतात. चव चांगली असल्याने बोहार भाजी महाग असली तरी लोकांकडून ही भाजी खरेदी केली जाते. बोहारच्या भाजीचा दर 400 रुपये प्रतिकिलो आहे. छत्तीसगडमध्ये बोहार भाजी मार्च ते मे महिन्यात उपलब्ध होते. ही झाडांवर येणारी भाजी आहे, फुलं येण्यापूर्वी ती तोडली जाते. ही भाजी तोडण्यासाठी अनुभवाची गरज असते.

बोहार भाजी फक्त छत्तीसगडमध्येच मिळते असे नाही इतर राज्यांमध्येही ही भाजी मिळते. लासोडा, गुंदा, भोकर या नावाने या भाजीची ओळख आहे. बोहार भाजीचे जीवशास्त्रीय नाव ‘कोर्डिया डाईकोटोमा’ हे आहे. भारतात काही ठिकाणी बोहार भाजीचं लोणचं बनवलं जातं. मात्र, बोहार भाजी फक्त छत्तीसगडमध्ये जेवणात वापरली जाते. चिंच टाकून बोहारची भाजी बनवली जाते.

Back to top button