Pune News : मंतरवाडी चौकात रास्ता रोको; महापालिका प्रशासनाचा निषेध | पुढारी

Pune News : मंतरवाडी चौकात रास्ता रोको; महापालिका प्रशासनाचा निषेध

फुरसुंगी : पुढारी वृत्तसेवा : सहा वर्षांपूर्वी महापालिकेत समाविष्ट झालेल्या उरुळी देवाची व फुरसुंगी या गावांमधील रस्ते, पाणी, कचरा निर्मूलन, आरोग्य व अन्य मूलभूत सुविधांचा प्रश्न ‘जैसे थे’ आहेत. महापालिका केवळ कर गोळा करण्याचे काम करत असल्याचा आरोप करत नागरिकांनी मंतरवाडी चौकात मंगळवारी रास्ता रोको आंदोलन करून प्रशासनाचा निषेध करण्यात आला. हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित केलेल्या या जनआक्रोश मोर्चात दोन्ही गावांतील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

या वेळी हडपसर-सासवड मार्गावर सकाळी दहाच्या सुमारास मंतरवाडी चौकात रास्ता रोको आंदोलन केले. या वेळी डोक्यावर पाण्याचे रिकामे हंडे घेत महिलांनी आपल्या कैफियत मांडली. या वेळी आंदोलकांनी महापालिकेविरोधात घोषणाबाजी केली. पाणीपुरवठा विभागाचे सहायक अभियंता विक्रम लहाने व संबंधित अधिकार्‍यांनी नागरिकांच्या विविध मागण्यांचे निवेदन स्वीकारले. या आंदोलनामुळे या मार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) हवेली तालुकाध्यक्ष प्रशांत भाडळे यांनी या आंदोलनाचे आयोजन केले होते. याप्रसंगी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे, माजी नगरसेवक गणेश ढोरे, राहुल चोरघडे, उत्तम गायकवाड, तात्या भाडळे, युवक अध्यक्ष प्रजित हरपळे, प्राची देशमुख, सुरेश झांबरे, नीता भाडळे आदींसह नागरिक उपस्थित होते.

हेही वाचा

 

Back to top button