सारसबाग चौपाटी होणार आधुनिक; महापालिका आयुक्तांची माहिती | पुढारी

सारसबाग चौपाटी होणार आधुनिक; महापालिका आयुक्तांची माहिती

पुणे : पुढारी वृत्तसेवा : सारसबाग चौपाटीचे रूपडे पालटणार असून या ठिकाणचा रस्ता बंद करून दुमजली ‘खाऊगल्ली’ उभारण्यात येणार आहे. या ठिकाणी ‘फूड प्लाझा’ उभारण्यासाठी तयार केलेल्या विकास आराखड्याच्या 18 कोटी 5 लाखाच्या पूर्वगणनपत्रकाला एस्टीमेट कमिटीने मान्यता देण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली. ऐतिहासिक सारसरबाग पुण्यातील आणि पुण्याबाहेरील पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे.

येथील खाद्यपदार्थांची चौपाटी बागेत येणार्‍या आबालवृद्धांसह अस्सल खवय्यांना कायमच खुणावते. त्यामुळे या परिसरात पार्किंग आणि अतिक्रमणांचा प्रश्न वारंवार उद्भवतो. दुसरीकडे व्यावसायिकांनी महापालिकेची परवानगी न घेताच दुकाने दुमजली केली आहेत. त्यामुळे येथील स्टॉलवर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून अनेक वेळा कारवाई केली जाते. या पार्श्वभूमीवर पर्यटक व व्यावसायिकांच्या गरजा लक्षात घेऊन प्रशासनाने येथील चौपाटीचा चांगल्याप्रकारे विकास करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार विकास आराखडाही तयार करण्यात आला.

सध्या चौपाटीवर अस्तित्वात असलेल्या खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सचे त्याच ठिकाणी पुनर्वसन करताना जागतिक दर्जाच्या  ब्रॅंड्सच्या खाद्यपदार्थांचे स्टॉल्सही असतील, असे नियोजन केले आहे.  या ठिकाणी सुनियोजित दुमजली खाऊगल्ली उभारली जाईल. या ठिकाणी साधारणपणे 100 दुकाने असतील, नागरिकांना मुक्तपणे बसता यावे यासाठी बसण्याची आकर्षक व्यवस्था, सार्वजनिक स्वच्छतागृह, सुमारे 200 वाहनांच्या पार्किंगसाठी बहुमजली वाहनतळ, अशी रचना असलेला विकास आराखडा तयार केला आहे. या कामासाठी 18 कोटी 50 लाख रुपये खर्च येणार आहे. या कामाच्या विकास आराखड्याला आणि एस्टीमेटला सोमवारी झालेल्या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली आहे. लवकरच या कामाची निविदा काढण्यात येईल, असे विक्रम कुमार यांनी नमूद केले.

हेही वाचा

Back to top button