राज्यातील 661 पैकी 78 अनधिकृत शाळा बंद | पुढारी

राज्यातील 661 पैकी 78 अनधिकृत शाळा बंद

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्यातील अनधिकृत व बोगस शाळांचा सुळसुळाट रोखण्यासाठी शिक्षण विभागाकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. त्यानुसार राज्यातील अनधिकृतरीत्या सुरू असलेल्या 661 शाळांपैकी 78 शाळा बंद करण्यात आल्या आहेत.
विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात आमदारांनी अनधिकृत शाळांवरील कारवाईबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी ही माहिती दिली.

अनधिकृत शाळा बंद करून फौजदारी कारवाई, गुन्हे दाखल करणे, दंड आकारण्याचे निर्देश क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात आले आहेत. राज्यात 661 अनधिकृत शाळांपैकी 78 शाळा बंद करण्यात आल्या आहेत. बंद केलेल्या शाळांतील 6 हजार 308 विद्यार्थ्यांचे समायोजन करण्यात आले. मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील एकूण 186 अनधिकृत शाळांपैकी 14 शाळा बंद करण्यात आल्या. तर उर्वरित 172 शाळांची तपासणी सुरू आहे. अनधिकृत शाळांबाबतच्या कामातील अनियमिततेबाबत विभागीय शिक्षण उपसंचालकांना ’कारणे दाखवा नोटीस, तर शिक्षणाधिकार्‍यांना नोटीस बजावण्यात आल्याची माहिती शिक्षणमंत्र्यांनी दिली.

नियमांत शिथिलता देण्याची मागणी

राज्यातील 2012 पूर्वीच्या अनेक शाळा, संस्थांकडून स्वयंअर्थसाहाय्यित शाळा अधिनियम 2012 मधील तरतुदींमध्ये शिथिलता देऊन शाळा नियमित करण्याची मागणी शासनाकडे करण्यात आल्याचे शिक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा

Back to top button