नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : रत्नागिरी, सिंधुदुर्गसह कोकणात अवकाळी पावसामुळे आंबा आणि काजू उत्पादकांना झालेल्या हानीचा मुद्दा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी आज लोकसभेत शून्यकाळात मांडला. नुकसानीची झळ बसलेल्या आंबा, काजू उत्पादकांना प्रतिकलम १५ हजार रुपये नुकसान भरपाई मिळावी, अशीही मागणी खासदार राऊत यांनी यावेळी केली.
खासदार राऊत म्हणाले की, मागील काही वर्षांपासून कोकणातील नैसर्गिक आपत्तींमुळे रत्नागिरी देवडगड हापूस आंबा, काजू उत्पादनावर विपरीत परिणाम झाला आहे. हंगाम वाया गेल्यास आंबा तसेच काजू उत्पादक शेतकऱ्यांना कर्जबाजारी व्हावे लागते. मागील वर्षी आंब्याचे उत्पादन केवळ १५ टक्के झाले होते. यंदा तर आंब्याला आलेला मोहोर अवकाळी पावसामुळे गळून पडला आहे. त्यामुळे उत्पादन १२ ते १५ टक्के येईल, अशी भीती खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केली. काजूच्या उत्पादनाचीही अशीच बिकट परिस्थिती असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीकविमा कंपन्यांकडून थातुरमातूर भरपाई दिली जात असल्याचा आरोपही केला.
रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा आणि काजू उत्पादक नुकसान भरपाईच्या मागणीसाठी आंदोलनाला बसले असल्याचा उल्लेख करताना खासदार राऊत यांनी आंबा, काजू उत्पादकांना प्रतिकलम १५ हजार रुपयांची नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी केली.
हेही वाचा :