तुम्ही दोघेही सत्तेत; मात्र मी कोठे ? महादेव जानकर यांचा सवाल | पुढारी

तुम्ही दोघेही सत्तेत; मात्र मी कोठे ? महादेव जानकर यांचा सवाल

शेळगाव : पुढारी वृत्तसेवा :  दत्तामामा भरणे व हर्षवर्धन पाटील तुमच्या पक्षाची राज्यात युती आहे. मात्र, आम्ही कुठे आहोत हे आम्हालाच माहीत नाही. तुम्ही दोघे आज मांडीला मांडी लावून बसलात, मी शेजारी बसलोय तरीदेखील दोघांनाही हाताला धरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे घेऊन जाईल व श्रीबाबीर देवस्थानासाठी निधी कमी पडून देणार नाही, अशी राजकीय टोलेबाजी माजी मंत्री व रासपचे अध्यक्ष आमदार महादेव जानकर यांनी केली. रुई (ता. इंदापूर) येथे रविवारी (दि. 10) महाराष्ट्र आणि अन्य राज्यांतील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीबाबीर देवस्थान मंदिराच्या जीर्णोद्धार कामाचे भूमिपूजन कार्यक्रमादरम्यान माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी राज्यमंत्री आमदार दत्तात्रय भरणे, रासपाचे अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकर आणि जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती प्रवीण माने हे एकाच व्यासपीठावर आले होते. त्या वेळी जानकर बोलत होते.

संबंधित बातम्या :

या वेळी जानकर म्हणाले, हर्षवर्धन पाटील यांचे थेट दिल्लीत चांगले संबंध व वजनदेखील आहे. आता ते मोदींच्या व अमित शहांच्या जवळ बसतात, तर दत्तात्रय भरणे यांनी फोन केला की अजितदादा लगेच फाईलवर सही करतात. अशा या दोन मोठ्या नेत्यांकडून मंदिराच्या कामासाठी निधीची जास्तीत जास्त गरज आहे. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले, सध्या मी स्वतः सत्तेत नाही, दत्तात्रय भरणे हे सत्तेत आहेत. कोणाचेही सरकार आले तरी ते सत्तेत असतात. त्यामुळे त्यांची जबाबदारी जास्त आहे. बाबीरदेव हे महादेवाचे रूप आहे. आमच्या सोबत एक महादेव (महादेव जानकर) उपस्थित आहे.

म्हणून आता निधीची कमतरता जाणवणार नाही. मंदिराच्या कामासाठी राजकारण बाजूला ठेवून सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. माझे वैयक्तिक 15 लाख मी देणार आहे, तर जानकर म्हणाले, मी 30 लाख निधी देणार आहे. आमदार दत्तात्रय भरणे म्हणाले, मंदिराच्या विकासासाठी यापूर्वी भरघोस निधी दिला आहे. यापुढेदेखील निधी उपलब्ध केला जाईल व मंदिरासाठी सहकार्य करण्यात येईल. प्रवीण माने यांनीदेखील बांधकाम सभापती असताना रस्ता, सभा मंडप, कुस्ती आखाडा व अन्य विकासकामे पूर्ण केली असून, मंदिराच्या विकासासाठी खासदार सुप्रिया सुळे या 25 लाख निधी देणार आहेत. आम्ही सोनाई उद्योग समूह व माने परिवाराच्या वतीनेदेखील भरघोस निधी उपलब्ध करणार असल्याचेदेखील माने यांनी सांगितले.

लोकसभा लढविण्याचे जानकरांचे संकेत
महादेव जानकर यांनी बाबीर देवस्थानाच्या विकासासाठी 30 कोटींचा निधी देणार असल्याची घोषणा केली. मात्र, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार दत्तात्रय भरणे व ग्रामस्थांनी जानकर यांची 30 लाखांऐवजी 30 कोटींची चूक लक्षात आणून दिली. त्या वेळी त्यांनी सांगितले की, तुम्ही जर मला खासदार केले अणि दिल्लीत पाठविले, तर मी 30 कोटींचादेखील निधी श्रीबाबीर देवस्थानासाठी देऊ शकतो. यावरूनच महादेव जानकर हे पुन्हा एकदा बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदारकीची निवडणूक लढवणार की काय? अशीदेखील चर्चा सुरू झाली आहे.

Back to top button