पुणे जिल्ह्यात सुमारे 25 लाख टन ऊसगाळप पूर्ण | पुढारी

पुणे जिल्ह्यात सुमारे 25 लाख टन ऊसगाळप पूर्ण

 पुणे : पुढारी वृत्तसेवा :  जिल्ह्यात चालू वर्ष 2023-24 मध्ये 12 कारखान्यांकडून आत्तापर्यंत 24 लाख 59 हजार 172 टन उसाचे गाळप पूर्ण झाले आहे; तर 8.46 टक्के सरासरी उतार्‍यानुसार 20 लाख 79 हजार 904 क्विंटलइतक्या साखरेचे उत्पादन हाती आले आहे. बारामती अ‍ॅग्रो या खासगी कारखान्याने ऊसगाळपात, तर साखर उत्पादन आणि उतार्‍यामध्ये सोमेश्वर सहकारीने आघाडी घेतली आहे.
जिल्ह्यात बारामती अ‍ॅग्रो या खासगी कारखान्याची दैनिक ऊसगाळप क्षमता सर्वाधिक म्हणजे 18 हजार टन आहे. या कारखान्याने सर्वाधिक 5 लाख 9 हजार 450 टन उसाचे गाळप पूर्ण केले आहे; तर सरासरी 6.02 टक्के उतार्‍यानुसार 3 लाख 6 हजार 660 क्विंटलइतके साखर उत्पादन तयार केले आहे.

संबंधित बातम्या :

तुलनेने सोमेश्वर सहकारीने 3 लाख 5 हजार 995 टन ऊसगाळप पूर्ण केले आहे; तर 10.16 टक्क्यांइतक्या सर्वाधिक उतारा घेत त्यांनी 3 लाख 10 हजार 750 क्विंटल साखर उत्पादन तयार केले आहे. ऊसगाळपात त्या खालोखाल भीमाशंकर सहकारी 2.26 लाख टन, माळेगाव सहकारीने 2.91 लाख टन, विघ्नहरने 2.07 लाख टनाइतके ऊसगाळप पूर्ण केल्याचे साखर आयुक्तालयाच्या 8 डिसेंबरअखेरच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

ऊसगाळप, साखर उत्पादनात सहकारी कारखान्यांची आघाडी
जिल्ह्यात चालू वर्षी 17 साखर कारखान्यांकडून सुमारे 1 कोटी 51 लाख टनाइतके ऊसगाळप होण्याची अपेक्षा आहे. प्रत्यक्षात 8 सहकारी आणि 4 खासगी मिळून बारा कारखान्यांचा हंगाम सुरू आहे. अद्याप काही कारखाने सुरू व्हायचे आहेत. दुष्काळी स्थितीमुळे प्रत्यक्षात सुरुवातीच्या अंदाजापेक्षा कमी ऊसगाळप होण्याची दाट शक्यता आहे. सहकारी साखर कारखान्यांनी 14.62 लाख टन ऊसगाळपातून सरासरी 9.24 टक्के उतार्‍यानुसार 13 लाख 51 हजार 385 क्विंटलइतके साखरेचे उत्पादन तयार केले आहे; तर खासगी कारखान्यांनी 9.96 लाख टनाइतके ऊसगाळप पूर्ण केले आहे; तर 7.31 टक्के उतार्‍यानुसार 7 लाख 28 हजार 519 क्विंटलइतके साखरेचे उत्पादन तयार केले आहे.

Back to top button