Pune News : कॉपी-पेस्ट शोधप्रबंधांना आता बसणार आळा | पुढारी

Pune News : कॉपी-पेस्ट शोधप्रबंधांना आता बसणार आळा

पुणे : पुढारी वृत्तसेवा : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न संशोधन केंद्रांमध्ये संशोधन करणार्‍या पीएच.डी.च्या विद्यार्थ्यांचे शोधप्रबंध कॉपी-पेस्ट तर नाहीत ना, हे पाहण्यासाठी त्याची सॉफ्टवेअरद्वारे तपासणी करण्यात येत होती. परंतु, आता युजीसीकडून ही तपासणी आणखी कठोर करण्यात आली आहे. त्यासाठी आणखी एका सॉफ्टवेअरची मदत घेतली जाणार आहे. त्यामुळे यापुढे कॉपी-पेस्ट शोधप्रबंधांना चांगलाच चाप बसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

विद्यापीठाच्या विविध विभागांचे विभागप्रमुख, संशोधन केंद्रांचे संचालक यांना विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागाच्या उपकुलसचिवांनी दिलेल्या निर्देशानुसार, पीएच.डी.चे प्रबंध स्वीकारताना विद्यार्थ्यांकडून त्याच्या प्रबंधासोबत वाङ्मयचौर्य अहवाल जमा करून घेण्यात येतो. ही प्रक्रिया विद्यापीठ अनुदान आयोगाने निश्चित केली असल्याने ती सर्व संशोधक विद्यार्थ्यांना अनिवार्य आहे. यापूर्वी पीएच.डी.चे संशोधन प्रबंध ‘Turnitin’ व  “Urkund’ या दोन सॉफ्टवेअरमध्ये तपासणी करून त्याचा अहवाल प्रबंधासोबत जमा करून घेण्यात येत होता.

संबंधित प्रबंध तपासणीची प्रक्रिया करण्यासाठी विद्यापीठामार्फत संशोधक मार्गदर्शकांना लॉगीन उपलब्ध देण्यात आले होते. परंतु भारत सरकारच्या उपक्रमांतर्गत ‘शोधशुद्धी’ या उपक्रमाचा एक भाग म्हणून INFLIBNET या प्रकल्पांतर्गत 01 नोव्हेंबर, 2023 पासून ‘Drillbit- Extreme Plagiarism Detection Software’  लागू करण्यात आलेले आहे.

त्याअनुषंगाने विद्यापीठ परिसर शैक्षणिक विभागातील संशोधक मार्गदर्शकांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांना संशोधन प्रबंध सादर करताना ‘Turnitin’ या सॉफ्टवेअरमध्ये तपासणी करून त्याचा वाङ्मयचौर्य अहवाल जमा करावा व संलग्नित संशोधन केंद्रातील संशोधक मार्गदर्शकांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांना संशोधन प्रबंध सादर करताना Drillbit- Extreme Plagiarism Detection Software द्वारे तपासणी करून त्याना वाङ्मयचौर्य अहवाल जमा करावा. वाङ्मयचौर्य अहवाल तपासणी करताना संशोधक मार्गदर्शकांनी त्यांच्या लॉगीनद्वारे तपासावा व तो अहवाल संशोधन केंद्राच्या डीएआयपी समितीच्या समोर ठेवून त्यावर सर्व सदस्यांच्या स्वाक्षरीसह विद्यापीठाकडे पाठवावा, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा

Back to top button