राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय अध्यक्षांची हत्या | पुढारी

राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय अध्यक्षांची हत्या

जयपूर; वृत्तसंस्था : श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांची जयपूरमधील त्यांच्या राहत्या घरात मंगळवारी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. भरदिवसा हा थरार घडला. तिघा हल्लेखोरांनी जवळपास 15 फैरी झाडल्या. घटनेदरम्यान गोगामेडी यांच्यासोबत असलेले अजित सिंह गंभीर जखमी झाले.

गोगामेडी यांना मेट्रो मास हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी तपासले व मृत घोषित केले. अजित सिंह यांना गोगामेडी यांच्या घरी घेऊन गेलेला नवीन नावाचा तरुणही या हल्ल्यात मारला गेला. हल्लेखोर आधी गोगामेडींसमोर सोफ्यावर बसले. त्यांच्याशी बोलले. दहा मिनिटांनी दोन हल्लेखोर उठले आणि गोळीबार सुरू केला. एका हल्लेखोराने निघताना परत येऊन गोगामेडींच्या डोक्यात गोळी घातली.
गोळीबारानंतर दोन हल्लेखोर धावत रस्त्यावर आले आणि त्यांनी कार थांबवून ती ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. चालकाला त्यांनी पिस्तूल दाखवताच चालकाने गाडी दामटली. मागून येणार्‍या स्कूटीस्वारावर गोळ्या झाडून त्याची स्कूटी घेऊन हल्लेखोर पळून गेले.

पद्मावत चित्रपटाला विरोध

पद्मावत चित्रपटाला विरोध आणि गँगस्टर आनंदपाल एन्काऊंटर प्रकरणात राजस्थानमध्ये झालेल्या आंदोलनांमुळे सुखदेव सिंग गोगामेडी प्रसिद्धीच्या झोतात आले होते. घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.

गोदार गँगने स्वीकारली जबाबदारी

गँगस्टर रोहित गोदारा याने या हत्यांची जबाबदारी स्वीकारली आहे. सोशल मीडियावर तशी पोस्टही त्याने शेअर केली. रोहित गोदारा हा लॉरेन्स बिष्णोई टोळीशी संबंधित आहे.
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेने हत्येच्या विरोधात आंदोलन सुरू केले असून हल्लेखोरांच्या त्वरित अटकेची मागणी केली आहे.

वसुंधराराजे शिंदेंकडून निषेध

माजी मुख्यमंत्री तसेच मुख्यमंत्रिपदाच्या एक दावेदार वसुंधराराजे शिंदे यांनी गोगामेडी यांच्या हत्येचा निषेध केला आहे. गोगामेडी यांच्या रूपात आम्ही एक कुशल समाजसंघटक गमावल्याचे वसुंधराराजेंनी म्हटले आहे.

Back to top button