नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा : जुन्नर तालुक्यातील पुणे नाशिक महामार्गाच्या पूर्वेकडील शेती सधन गाव म्हणजे बोरीगाव. या गावची लोकसंख्या सहा हजारांच्या आसपास आहे. जुन्नर तालुक्यात विविध देवदेवतांची सर्वाधिक मंदिर असलेले गाव अशी या गावाची ओळख आहे. बोरीत तब्बल 17 पेक्षा जास्त मंदिर आहेत. त्यातील बहुतांश मंदिरे पुरातन काळातील आहेत.
बोरी गावात बुवासाहेब मंदिर, बायजाबाई मंदिर, श्रीहनुमान मंदिर, श्रीविश्वेश्वर मंदिर, श्रीभैरवनाथ मंदिर, श्रीराम मंदिरे दोन, श्रीमुक्ताबाई मंदिर, श्रीविठ्ठल-रुक्मिणी मंदिर, श्रीसिद्धेश्वर मंदिर, श्रीदत्त मंदिर, मुक्ताई मंदिर, गोसावी बाबा मंदिर, बोलाबाबा मंदिर, श्रीजनाई मंदिर, श्रीकमलामाता मंदिर, पीरबाबा मंदिर, श्रीचारंगेश्वर मंदिर, मोठा पीर मंदिर, छोटा पीर मंदिर, जालिंदर बाबा मंदिर, पीर बाबा मंदिर, धावडे पीरबाबा मंदिर, श्रीबिरोबा महाराज मंदिर, पीरबाबा मंदिर, मोडके मळा श्रीम्हसेश्वराची दोन मंदिरे, कुंभारमळा श्रीचारंगेश्वर मंदिर, डेरेमळा मुंजाबाबा मंदिर, जाधव मळा सदबाबा मंदिर, धोंडबाबा मंदिर, कोरडे मळा नानाबाबा मंदिर, कोरडेमळा दावजीबाबा मंदिर, ज्ञानेश्वर मंदिर, वीर साहेब मंदिर, हनुमान मंदिर, धावजी बाबा मंदिर, सावता माळी मंदिर, चारंग बाबा मंदिर, मुंजा बाबा मंदिर, श्रीगणपती मंदिर आदी मंदिरे आहेत.
बोरी गाव हे पौराणिक गाव असून, ऐतिहासिक जुनी बाजारपेठ तसेच नगर ते जुन्नरमधील मोठी बाजारपेठ आहे. इंग्रजांच्या काळात मास्टर प्लॅन करून वसवलेलं हे गाव आहे. गावात कोणत्याही चौकात उभं राहिलं तरी संपूर्ण गाव दिसतं. गावातील सगळे रस्ते सरळ आहेत. सर्व जातींचे लोक येथे वास्तव्यास आहेत.
पुरातन काळातील दगडी भांडी, हस्तिदंत, अवजारे येथे पाहावयास मिळत आहेत. या गावात रेडामुख असून, श्रीज्ञानेश्वर महाराज व त्यांची भावंड बोरीमार्गे आळंदीला गेल्याची आख्यायिका सांगितली जाते. दरम्यान, गावात असलेली बहुतांशी मंदिरे शंभर वर्षांपेक्षा जुनी असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
हेही वाचा