खासदार डॉ. कोल्हेंच्या गावभेट दौर्‍याला अल्प प्रतिसाद | पुढारी

खासदार डॉ. कोल्हेंच्या गावभेट दौर्‍याला अल्प प्रतिसाद

कोंडीभाऊ पाचारणे

राजगुरुनगर : शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार, अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांच्या खेड तालुक्यातील नुकत्याच झालेल्या गावभेट दौर्‍याला नागरिकांचा अत्यंत कमी प्रतिसाद मिळाल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. पाईट, कोये, कुरकुंडी, कोहिंडे, तोरणे आदी गावांतून 20 नोव्हेंबरला हा दौरा झाला. मात्र, या वेळी खासदार डॉ. कोल्हे यांच्यासोबत मोजकेच कार्यकर्ते होते. एसटी बसमध्ये बसून प्रवास, शेतात जाऊन मजुरांसोबत भात झोडणी करून डॉ. कोल्हे यांनी ग्रामीण जनतेला भुरळ घातली.

पण त्यामुळे दौर्‍यात गर्दी झाली नाही. मंदिर, चावडीवर सुरू असलेल्या कार्यक्रमांना हजेरी लावत डॉ. कोल्हे यांनी आपला दौरा आटोपता घेतला. यापूर्वी मात्र डॉ. कोल्हे येणार असे म्हटल्यावर गावेच्या गावे रस्त्यावर येत होती. त्यात तरुणाई आणि महिलांचा सहभाग लक्षणीय होता. या वेळी असे चित्र कुठेही दिसले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर खासदार शरद पवार यांच्याबरोबर असलेल्या डॉ. कोल्हे यांनी खेड तालुक्यात केलेला हा पहिलाच दौरा होता. तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत आहेत. खेड तालुक्यातील जनता व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आमदारांना मानणारे आहेत. त्याचाच फटका डॉ. कोल्हे यांच्या दौर्‍याला बसल्याचे मानले जात आहे.

शिरूर लोकसभा मतदारसंघात माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना रोखण्यासाठी मागील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने डॉ. कोल्हे यांना उमेदवारी दिली. एकत्रित असलेल्या त्या वेळच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून डॉ. अमेाल कोल्हे खासदार झाले. मात्र चार वर्षात डॉ. कोल्हे मतदारसंघात फिरकले नाहीत, असे आरोप होत गेले. जनतेला वार्‍यावर सोडून केवळ संसदेत प्रश्नावली मांडली. ‘संसदरत्न’ पुरस्कार मिळवला. प्रत्यक्षात ठोस निर्णय किंवा ठोस विकासकामे त्यांच्याकडून झाली नाहीत, असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

विकासकामे सोडा, खासदार कोणाच्याही सुख-दुःखात सहभागी झाले नाहीत. फोन करून कंटाळून गेलो, पण पीएच्या पलीकडे संपर्क गेलाच नाही, असा आरोप हे कार्यकर्ते करीत आहेत. एवढेच काय, ज्या आमदारांनी जिवाचे रान करून डॉ. कोल्हे यांना उमेदवारी दिली, निवडून आणले त्या आमदारांनादेखील प्रतिसाद मिळाला नाही, असे बोलले जाते. खासदार शरद पवार यांच्या अगदी जवळ असलेले मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासह मतदारसंघातील सगळे आमदार अजित पवार गटात सामील झाले. डॉ. कोल्हे यांनी मात्र या आमदारांना सोडून मोठ्या पवारांकडे राहणे पसंत केले.

दौर्‍याबाबत कार्यकर्त्यांकडूनच प्रश्नचिन्ह

कोहिंडे बुद्रुक, तळवडे, पाईट, परळी, तोरणे, या ठिकाणी खासदार गेले; परंतु या ठिकाणी नागरिकांचा प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर खासदार डॉ. कोल्हे दौरा अर्धवट सोडून पापळवाडी, अहिरे, धामणे, कोये, कुरकुंडी या ठिकाणी न जाता निघून गेले. खासदार डॉ. कोल्हे पाच वर्षांतून एकदाच या भागात आल्याने सोशल मीडियावरदेखील काही कार्यकर्त्यांनी त्यांच्या दौर्‍याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ‘तुम्ही अगोदर या ठिकाणी केलेल्या कामांची यादी दाखवा, मगच गावांना भेट द्या,’ असे एसएमएस त्यांच्या समर्थकाने तयार केलेल्या पिंपरी-पाईट व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर टाकण्यात आले.

हेही वाचा

Back to top button