बारामती : पुढारी वृत्तसेवा : 'जे ज्याच्या हक्काचे आहे ते त्याच्याकडे राहिले पाहिजे, ही माझी भूमिका आहे; परंतु आता पक्ष कोणाचा यावरून न्यायालय आणि आयोगापुढे कामकाज सुरू आहे. पक्ष हातातून गेला तरी आम्ही पुन्हा तयारी करू,' असे मत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले. बारामती तालुक्याच्या गावभेट दौर्यात त्या पत्रकारांशी बोलत होत्या. खा. सुळे म्हणाल्या, 'राष्ट्रवादीची स्थापना ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली आहे. ते स्थापनेपासून अध्यक्ष आहेत. आजवर अध्यक्षपदावरून त्यांना कधीही हटवले गेलेले नाही. त्यामुळे पक्षाबाबत आता कोणी दावा करत असेल तर तो कितपत योग्य आहे? माझ्याकडे सत्ता किंवा संघर्ष असे दोन पर्याय होते. मी संघर्षाचा पर्याय निवडला.'
संबंधित बातम्या :
'कॅबिनेटमध्ये मंत्री एकमेकांशी चर्चाच करत नाहीत. सत्तेतील दोन मंत्री माध्यमांतून एकमेकांवर टीका करतात. याचा अर्थ कॅबिनेटमध्ये त्यांचे बोलणे होत नाही. पण, या सगळ्यात सर्वसामान्य माणूस भरडला जात आहे. आरक्षणाच्या प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वांना एकत्र बसवावे. अधिवेशन बोलावत मार्ग काढावा,' असे मत त्यांनी व्यक्त केले. 'राज्यातील दुष्काळी स्थितीसाठी केंद्राकडे केवळ 2 हजार 600 कोटींची मागणी केली आहे. एवढ्या रकमेतून कशी मदत करणार?' असा सवाल खा. सुळे यांनी केला. 'दुसरीकडे मंत्रालयाच्या बिल्डिंगसाठी 7 हजार कोटींची तरतूद केली जात आहे. मंत्रालयाची बिल्डिंग चांगली असताना दुसरी बांधण्याचे काही कारण नाही. या पैशातून दुधाला अनुदान, सरसकट कर्जमाफी, अंगणवाडी सेविकांचे प्रश्न सुटू शकतील.'
'बारामतीत सहकारी संस्थांवर वर्चस्वासाठी प्रयत्न करणार का?' या प्रश्नावर त्या म्हणाल्या, 'हळूहळू बदल होईल. पण मी राजकारणात सेवेसाठी आले आहे. वर्चस्वासाठी नाही. धोरणात्मक कामात मला रस आहे. शरद पवार यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत धोरणात्मक कामावरच भर दिला.'
वर्ध्यातून निवडणूक लढवण्याचा विषय नाही
'बारामती ही माझी कर्मभूमी, जन्मभूमी आहे. मी वर्ध्यातून लोकसभा निवडणूक लढवणार, असे बोलले जात आहे. पुण्यानंतर मला वर्धा प्रिय आहे. मी वर्षातून दोनदा तेथे जाते. सेवाग्राम व पवनार आश्रमाला भेट देते. माझ्यावर महात्मा गांधी व विनोबा भावे यांचा प्रभाव आहे; परंतु तेथून निवडणूक लढविण्याचा विषय नाही,' असेही खा. सुळे यांनी स्पष्ट केले.
सरसकट कर्जमाफी करा
'शेतक-यांचे कंबरडे मोडण्याचे पाप ट्रिपल इंजिन खोके सरकार करते आहे,' अशी टीका करून खासदार सुळे म्हणाल्या, 'राज्यात एकीकडे दुष्काळ आहे, दुसरीकडे अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे शरद पवार कृषिमंत्री असताना जशी सरसकट कर्जमाफी मिळाली होती, तशी या सरकारने देण्याची गरज आहे. छोट्या-छोट्या कामांसाठी, पालकमंत्री बदलण्यासाठी मंत्री खासगी विमानाने दिल्ली वार्या करीत आहेत. त्यांनी एखादी वारी सरसकट कर्जमाफीसाठीही करावी,' अशी मागणी खासदार सुळे यांनी केली.