Supriya Sule : जुन्या जाणत्यांसोबत खा. सुळेंचा गावभेट दौरा | पुढारी

Supriya Sule : जुन्या जाणत्यांसोबत खा. सुळेंचा गावभेट दौरा

बारामती : पुढारी वृत्तसेवा :  बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खा. सुप्रिया सुळे यांचा गावभेट दौरा गुरुवारी (दि. 30) बारामती पश्चिम भागात पार पडला. पक्षातील फुटीनंतर अजित पवार गटाच्या पदाधिकार्‍यांनी सुळेंच्या दौर्‍याकडे पाठ फिरवली; परंतु पक्षाचे जुनेजाणते नेते मात्र उपस्थित होते हे विशेष. राष्ट्रवादीतील फुटीनंतर यापूर्वी खासदार सुप्रिया सुळे यांचा ग्रामीण भागाचा दौरा पार पडला होता. त्यावेळी राष्ट्रवादीचे पदाधिकारी त्यांच्या दौर्‍यात सहभागी झाले होते; परंतु आता पक्ष कोणाचा यासंबंधी न्यायालय आणि निवडणूक आयोगात लढाई चालू आहे.

त्यामुळे गुरुवारच्या सुळे यांच्या दौर्‍याकडे अजित पवार गटातील पदाधिकार्‍यांनी पाठ फिरवली; परंतु सर्वसामान्यांनी मात्र सुळे यांचे जोरदार स्वागत केले. सलग तीन वेळा खासदार राहिलेल्या सुप्रिया सुळे यांच्या या अगोदरच्या गावभेट दौर्‍याला प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहत होते. गुरुवारच्या दौर्‍यात त्यांची कमी होती.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर खासदार सुळे यांनी गावभेट दौरा सुरू केला आहे. गुरुवारी त्यांनी पश्चिम भागातील निंबूत, वाघळवाडी, करंजेपूल, मुरूम, वाणेवाडी, सोरटेवाडी या भागात गावभेट दौरा केला. ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य तसेच ग्रामस्थांनी त्यांचे स्वागत केले. मात्र, प्रमुख पदाधिकार्‍यांनी त्यांच्या दौर्‍याकडे पाठ फिरवल्याने राष्ट्रवादीत खरोखरच दोन गट झाले असल्याचे चित्र बारामतीत पाहायला मिळाले.

खासदार सुळे याबाबत काहीही बोलल्या नसल्या तरीही प्रमुख पदाधिकार्‍यांची अनुपस्थिती मात्र जाणवत होती. जुन्याजाणत्या मंडळींनी मात्र ज्येष्ठ नेते शरद पवार यांनाच साथ देण्याचे निश्चित केल्याचे या दौर्‍यातून दिसत आहे. दौरा निश्चित झाल्यानंतर अनेक पदाधिकार्‍यांनी विविध कामांचे कारण सांगून खा. सुळे यांच्या दौर्‍याकडे पाठ फिरवली.

वाणेवाडी येथे ज्येष्ठ व आजी-माजी पदाधिकारी
एकीकडे पदासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे उंबरे झिजवणार्‍या पदाधिकार्‍यांनी उतारवयात शरद पवार यांना दिलेला झटका सर्वसामान्य मतदार ओळखून आहेत. काही जणांनी पवार हेच कुटुंब असल्याचे सांगत दौर्‍यात सहभाग घेतला. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या कायम पाठीशी राहणारे गाव म्हणून वाणेवाडी गावाची ओळख आहे. त्यामुळे या ठिकाणी अनेक ज्येष्ठ व आजी-माजी पदाधिकार्‍यांनी खा. सुळे यांचे उत्साहात स्वागत केले.

Back to top button