पुणे : पुढारी वृत्तसेवा : आई-वडिलांचा सतत सन्मान करा, मनात मोठी स्वप्नं ठेवून ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा, यश नक्की मिळतेच.. हे उद्गार आहेत कोल्हापूरच्या मराठमोळ्या हर्षवर्धन शैलेश भोसले याचे… त्याला कांस्यपदक देऊन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सन्मानित केले. एनडीएच्या मैदानावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत एनडीएची पासिंग आऊट परेड झाली. या वेळी सुवर्ण, रौप्य व कांस्यपदके देऊन छात्रांचा गौरव करण्यात आला. पण, सर्वांचे लक्ष वेधले ते कोल्हापूरच्या मराठमोळ्या हर्षवर्धन भोसले याने.
त्याला राष्ट्रपतींच्या हस्ते एनडीएचे कांस्यपदक देऊन सन्मानित करण्यात आले. खास 'पुढारी'शी बोलताना हर्षवर्धन म्हणाला, की मी कोल्हापूरचा आहे. माझे वडील शैलेश भोसले कोल्हापूर अर्बन बँकेत नोकरी करतात. माझे आजोबा लष्करात मोठ्या पदावर होते. त्यांच्याकडून प्रेरणा घेतली आणि मी इयत्ता सहावीत असतानाच लष्करी अधिकारी होण्याचा निर्णय घेतला. आठवीत डेहराडूनच्या लष्करी विद्यालयात प्रवेश मिळवला.
हर्षवर्धन म्हणाला, आधी तुम्हाला काय व्हायचे आहे हे लक्ष्य ठरवावे लागते. लक्ष्य ठरवले नाही तर मेहनत कोणत्या दिशेने करायची हेच कळत नाही. त्यामुळे मी लहानपणीच लष्करात करिअर करण्याचा ध्यास घेतला अन् तो आज पूर्ण झाला. कधीच हार मानू नका, खचू नका, संकटांशी सामना करा, यश नक्कीच मिळते, असा मंत्र त्याने दिला.
हेही वाचा