

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : सातवा वेतन आयोगासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी केएमटी कर्मचारी गुरुवारी मध्यरात्रीपासून म्हणजेच शुक्रवारपासून संपावर जाणार होते. परंतु, कर्मचार्यांनी गुरुवारी सायंकाळपासूनच बेमुदत बंद सुरू केला. चालक-वाहकांनी सर्वच बसेस वर्कशॉपमध्ये नेऊन लावल्या. त्यामुळे कोल्हापूरची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ठप्प झाली. अचानक सुरू झालेल्या संपामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. प्रवाशांना वडापसह इतर वाहतुकीचा आधार घ्यावा लागला. अनेकांना पायपीट करावी लागली. दरम्यान, शास्त्रीनगरमधील वर्कशॉपमध्ये एकत्र आलेल्या कर्मचार्यांनी मागण्या मान्य होईपर्यंत संप सुरू ठेवण्याचा निर्धार केला.
महापालिका कर्मचार्यांना सातवा वेतन आयोग लागू केल्याने केएमटी कर्मचार्यांना सातवा वेतन द्यावा, अशी मागणी आहे. त्यानुसार केएमटीने प्रस्ताव तयार करून महापालिकेकडे पाठविला आहे. प्रशासनाने हा प्रस्ताव राज्य शासनाला 30 नोव्हेंबरपर्यंत पाठवावा, अशी कर्मचार्यांची मागणी आहे. मात्र, महापालिकेने अद्यापही शासनाला प्रस्ताव पाठविलेला नाही.
केएमटीत चालकाची 292 पदे मंजूर असून, त्यापैकी 147 रिक्त आहेत. वाहकाची 214 पदे मंजूर असून, 95 रिक्त आहेत. त्यापैकी अनुक्रमे चालक 81 व वाहक 80 ही पदे रोजंदार कर्मचार्यांतून तत्काळ भरावीत, अशी मागणी आहे. परंतु, प्रशासन त्यासाठी तयार नाही.
अनुकंपा तत्त्वावरील वर्कशॉपमधील 8 कर्मचारी आणि चालक, वाहक 8 यांना सेवेत कायम करा. ठोक मानधन तत्त्वावर घेतलेल्या वाहक 25 व चालक 25 यांना सी बॅचमध्ये सामावून घ्यावे. तसेच महागाई भत्ता मिळावा आदी मागण्यांसाठी संप पुकारण्यात आला आहे, अशी माहिती कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष निशिकांत सरनाईक यांनी दिली.