येवला शहर व परिसरात दाट धुक्याची चादर | पुढारी

येवला शहर व परिसरात दाट धुक्याची चादर

येवला(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा- येवला शहरासह परिसरात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून हलक्या प्रमाणात दिसणारे धुके शुक्रवारी (१ डिसेंबर) रोजी गडद झाले होते. येवलेकरांची शुक्रवारची पहाट दाट धुक्यांनीच उजाडली. सकाळी येवला शहरात सगळीकडे धुक्याची चादर पसरली होती.

हिवाळा सुरू झाला असून, आता वातावरणात गुलाबी थंडी पसरू लागली आहे. गेल्या आठवड्यापासून तर शहर व परिसरात अवकाळी पावसामुळे थंडीचे प्रमाण वाढत आहे. त्यातच शुक्रवारी सकाळी येवला शहर व परिसरात धुक्याची चादर पसरली होती. दाट धुक्यामुळे शहरातील व बाहेरील रस्तेसुद्धा दिसत नव्हते. वाहनचालकांना रस्त्याचा अंदाज येत नसल्याने वाहतूक संथ गतीने सुरू होती. दाट धुक्यांमुळे फिरायला जाणाऱ्या नागरिकांसह, शाळकरी मुले आणि कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्यांना धुक्यातून वाट काढावी लागत होती. पंधरा ते वीस फुटांवरील घरे, वाहनेही धुक्यामुळे दिसत नव्हती.

दिवसभर तापमानात वाढ होऊन रात्रीच्या वेळी कधी थंडी पडत आहे. तर कधी ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. कधी अवकाळी पाऊस आणि सकाळी दाट धुके सुध्दा पडताना दिसून येत आहे. या बदलत्या हवामानामुळे रब्बी पिकांचे मोठे नुकसान होताना पहायला मिळत आहे. त्यामध्ये लाल कांदा , उन्हाळी कांदा रोप बुरशीजन्य रोगाला सामोरे जात आहे तर गहू, हरभरा, तूर आदी पिकांवर अळीचा प्रादुर्भाव होत आहे. तसेच काही ठिकाणी हरभऱ्यांची पिके मर रोगाने करपुन जाण्याचा धोका असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठी मेहनत घेऊन पिकवलेले पिक वाया जाण्याच्या मार्गावर आहे.

Back to top button