कोल्हापूर : दगडाने ठेचून मित्राचा खून; दोघा तरुणांना अटक | पुढारी

कोल्हापूर : दगडाने ठेचून मित्राचा खून; दोघा तरुणांना अटक

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून दोघा तरुणांनी डोक्यात दगड घालून शुभम अशोक पाटील (वय 30, रा. रामानंदनगर, कोल्हापूर) या तरुणाचा खून केला. खून करणारे दोघेही शुभमचे मित्रच आहेत. परंतु, मद्य प्राशन केल्यानंतर या तिघांत पुन्हा भांडण झाल्याने शुभमच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी तत्काळ तपास करत संग्राम रंगराव पाडळकर (26, रा. पाडळकर कॉलनी), शुभम ऊर्फ बंडा प्रकाश मोरे (25, रा. आयसोलेशन हॉस्पिटलजवळ, नेहरूनगर) या दोघांना अटक केली.

शुभम अशोक पाटील आणि शुभम ऊर्फ बंडा मोरे, संग्राम पाडळकर हे पूर्वीपासून मित्रच आहेत. या मित्रांमध्ये 2019 पासून वाद सुरू झाला होता. या वादातून शुभम पाटील याने शुभम मोरेच्या घरात जाऊन शिवीगाळ करून मारहाण केली होती. त्याचा राग शुभम मोरेच्या मनात होता. बुधवारी रात्री हे तिघेही मित्र दारू पिण्यासाठी घराबाहेर पडले होते. दारू पिऊन ते पुन्हा घराकडे जात असताना मैलखड्डा परिसराजवळ आल्यानंतर त्यांच्यातील जुना वाद पुन्हा उफाळून आला. या वादातूनच या तिघांत हाणामारीला सुरुवात झाली. यावेळी शुभम ऊर्फ बंडा मोरे आणि संग्राम पाडळकर या दोघांनीही मैदानात पडलेला मोठा दगड शुभम अशोक पाटीलच्या डोक्यात घातला. त्याचे डोके दगडाने पूर्णपणे ठेचण्यात आले. या घटनेत शुभम जागीच ठार झाला. घटनास्थळी रक्ताने पूर्णपणे माखलेला दगड आणि रक्ताचा सडा पडला होता.

मैलखड्डा परिसरात गंभीर घटना घडल्याची माहिती अज्ञातांनी पोलिसांना कळविली. त्यामुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे पोलिस तत्काळ घटनास्थळी गेले. पोलिस उपअधीक्षक अजित टिके, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक वाघमोडे, जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सतीशकुमार गुरव आदींनी घटनास्थळी धाव घेतली. मृत तरुणाची ओळख पटल्यानंतर तपासाची चक्रे गतीने फिरली. पोलिसांनी दोन ते तीन टीम तयार करून संशयितांचा शोध घेतला. यावेळी शुभम ऊर्फ बंडा मोरे आणि संग्राम पाडळकर हे दोघेही संशयित पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्यांना पकडले. याप्रकरणी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

खुनाचे गुन्हे उघडकीस

गेल्या काही दिवसांत जुना राजवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत तीन खून झाले आहेत. या तिन्हीही खुनांचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आल्याचे जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सतीशकुमार गुरव यांनी पत्रकारांना सांगितले.

Back to top button