सावधान..! महाराष्ट्रात ‘झिका’ पाय पसरतोय

सावधान..! महाराष्ट्रात ‘झिका’ पाय पसरतोय
Published on
Updated on

कोल्हापूर : पैशाचे झाड म्हणून ओळखले जाणारे मनीप्लँट आपल्या घरात लावले असेल, तर कुंडीतील पाणी आठवड्याला बदला. रेफ्रिजरेटरमधील साचणारे पाणी दर चार दिवसांनी बदलून घ्या आणि घर आणि सभोवतालचे सर्व स्वच्छ पाण्याचे साठे वेळीच नष्ट करा. कारण डेंग्यूच्या डासांबरोबर आता 'झिका' विषाणूंचा संसर्ग पसरविणारे डास आपल्या कुटुंबाचे स्वास्थ्य बिघडवू शकतात. राज्यात 'झिका' विषाणूबाधित 11 रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये कोल्हापुरातील सर्वाधिक सात रुग्णांचा समावेश आहे. नागरिकांनी डेंग्यूप्रमाणेच 'झिका' विषाणूला प्रतिबंध करण्याची गरज आहे.

इचलकरंजीमध्ये वृद्धेला, सांगलीत दुसरा रुग्ण, तर 3 नोव्हेंबर रोजी कोल्हापुरातील नागाळा पार्कमध्ये तिसर्‍या रुग्णाची नोंद झाली. कोल्हापुरातून पाठविण्यात आलेल्या गरोदर मातांच्या रक्ताच्या नमुन्यांमध्ये पाच नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. पुण्याच्या येरवडा भागात एक व पालघर जिल्ह्यात दोन रुग्ण आढळून आले आहेत. या वाढत्या रुग्णसंख्येचे गांभीर्य राज्यातील साथरोग निर्मूलन विभागाने घेतले आहे असे नाही, तर केंद्र शासनाने 'झिका' विषाणूला अटकाव करण्यासाठी गांभीर्याने पावले उचलली आहेत. गेल्या सप्ताहात कोल्हापुरात या स्थितीचे अवलोकन करून साथरोग निर्मूलन विभागाशी संबंधित अधिकारी, कर्मचार्‍यांना मार्गदर्शन करण्यासाठी एक पथक कोल्हापुरात दाखल झाले. केंद्र शासनाचे संशोधन अधिकारी निखिल गोंधळे, राज्य कीटकशास्त्रज्ञ डॉ. सोपान अनुसे यांच्या नेतृत्वाखाली या पथकाने दोन दिवशी कोल्हापूर व सांगलीमध्ये कार्यशाळा घेतल्या. कोल्हापूर जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. विनोद मोरे, महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. निखिल पाटील यांच्यासह सुमारे 40 अधिकारी-कर्मचार्‍यांची कोल्हापुरात कार्यशाळा झाली.

इचलकरंजीमध्ये 'झिका'चा पहिला रुग्ण सापडल्यानंतर त्याच्या सान्निध्यात पाच किलोमीटर अंतरावरील सुमारे 44 रुग्णांचे नमुने पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. हे सर्व रिपोर्ट निगेटिव्ह आले. त्यानंतर पाठविण्यात आलेले 412 रुग्णांच्या नमुन्यांचा अहवाल अद्याप येणे बाकी आहे. सांगलीमध्ये महापालिकेच्या वतीने पाठविण्यात आलेले 16 रुग्णांचे नमुने निगेटिव्ह आले असले, तरी या बैठकीत गरोदर माता, तापाने बाधित रुग्णांचे नमुने घेण्याचे आदेश देण्यात आले. यापैकी काही नमुने पॉझिटिव्ह आल्यामुळे आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. गरोदर मातांना या विषाणूची लागण अत्यंत जोखमीची समजली जाते आहे. यामुळे मातेच्या अर्भकाच्या मेंदूवर परिणाम होतो. डोके आणि मेंदूचा आकार कमी होऊन अर्भकाला अपंगत्व येण्याची शक्यता असते. यामुळे गरोदर माता आणि अंग व डोकेदुखी आणि लवकर बर्‍या न होणार्‍या तापाच्या रुग्णांनी आपल्या रक्तनमुन्यांची तपासणी करून घेणे गरजेचे आहे.

झिकाच्या मोफत चाचण्या

शासकीय रुग्णालयाला याची माहिती दिल्यास रुग्णालयामार्फत एनआयव्ही, पुणे येथे या चाचण्या मोफत होऊ शकतात. तसेच काही मोजक्या खासगी प्रयोगशाळेतही या चाचण्या केल्या जातात. डेंग्यूप्रमाणेच स्वच्छ पाण्याचे साठे नष्ट करणे, अंगभर कपड्यांचा वापर करणे आदी प्राथमिक बाबी गांभीर्याने घेणे गरजेचे असल्याचे आवाहन राज्य कीटकशास्त्रज्ञ डॉ. सोपान अनुसे यांनी दैनिक 'पुढारी'शी बोलताना केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news