तळेगाव ढमढेरे : पुढारी वृत्तसेवा : वढू बुद्रुक येथील एका युवकाने गावातील युवतीशी प्रेमविवाह केल्यानंतर दोन्ही कुटुंबात चर्चा करण्यासाठी बसलेल्या लोकांमध्ये वाद होऊन दोन्ही कुटुंबात हाणामारी झाली. ही घटना रविवारी (दि. 26) घडली. याप्रकरणी कैलास सदाशिव गिते, संतोष गिते, मंदा गिते, लता गिते, मयूर जीवन पांडे, नीरज जीवन पांडे, आदित्य नीरज पांडे व श्रद्धा अजय तिवारी यांच्याविरुद्ध शिक्रापूर पोलिस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथील कैलास गिते यांच्या मुलाने गावातील नीरज पांडे यांच्या मुलीशी प्रेमविवाह केला. त्यामुळे नीरज पांडे हे बहीण श्रद्धा तिवारी व काही नातेवाईकांसह कैलास गिते यांच्या घरी चर्चा करण्यासाठी गेले होते.
संबंधित बातम्या :
चर्चेदरम्यान दोन्ही गटात वाद झाला. या वेळी दोन्ही गटांनी एकमेकांना शिवीगाळ, दमदाटी करत हाणामारी केली. याबाबत श्रद्धा अजय तिवारी (वय 38, रा. सावरगाव, ता. येवला, जि. नाशिक) व कैलास सदाशिव गिते (वय 58, रा. शंभूनगरी सोसायटी वढू बुद्रुक, ता. शिरूर, मूळ रा. शिवाजीनगर अकोला, जि. अकोला) यांनी परस्परविरोधी फिर्याद दिली. त्यामुळे शिक्रापूर पोलिसांनी कैलास सदाशिव गिते, संतोष गिते, मंदा गिते, लता गिते (सर्व रा. शंभूनगरी सोसायटी वढू बुद्रुक, ता. शिरूर) तसेच मयूर जीवन पांडे, मयूर पांडे यांची बहीण, नीरज जीवन पांडे, आदित्य नीरज पांडे (सर्व रा. शंभूनगरी सोसायटी वढू बुद्रुक, ता. शिरूर) यांच्याविरुद्ध परस्परविरोधी गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र बनकर हे या घटनेचा तपास करीत आहेत.