अवकाळीमुळे दुर्दशा ! डाळिंब, द्राक्ष, सीताफळ, पेरू बागांचे मोठे नुकसान | पुढारी

अवकाळीमुळे दुर्दशा ! डाळिंब, द्राक्ष, सीताफळ, पेरू बागांचे मोठे नुकसान

टाकळी हाजी/पिंपरखेड : पुढारी वृत्तसेवा : शिरूर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील गावांमध्ये रविवारी (दि. 26) अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीने थैमान घातल्याने शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले. दुपारी पावणेचारच्या सुमारास गारपीट आणि रात्री विजेच्या गडगडाटासह जोरदार पाऊस झाला. यापूर्वी कधीही न अनुभवलेला अवकाळी पाऊस या वेळी पाहावयास मिळाला. टाकळी हाजी, कवठे येमाई, माळवाडी, सविंदणे, वडनेर, फाकटे, निमगाव दुडे या गावांमध्ये सोसाट्याच्या वार्‍यासह गारपीट झाली. यामुळे डाळिंब, द्राक्षे, सीताफळ, पेरू या फळबागांबरोबरच ऊस, बटाटा, मका, गहू, हरभरा, कांदा तसेच जनावरांचा चारा या पिकांचे मोठे नुकसान झाले.

टाकळी हाजी परिसरातील गारपीट इतकी मोठ्या प्रमाणात झाली की, साबळेवाडी, उचाळेवस्ती, माळवाडी, होनेवाडी, सोदकवस्ती, टेमकरवाडी, शिनगरवाडी या परिसरातील सर्व फळबागांचे प्रचंड नुकसान झाले. झाडांची पानगळ झाली असून, जनावरांचा चारा भुईसपाट झाला. शेतातील सर्व पीक वाया गेल्याने शेतकरी हताश झाले आहेत. तोडणीस आलेला ऊस आडवा झाल्याने कारखान्याने तोडणीसाठी यास प्राधान्य द्यावे, सर्व पिके वाया गेल्याने किमान उसाची लवकर तोड झाल्यास संबंधित शेतकर्‍यांना कमी प्रमाणात झळ बसेल, अशी अपेक्षा शेतकर्‍यांकडून व्यक्त होत आहे.डाळिंबाचे आगार समजल्या जाणार्‍या टाकळी हाजी परिसरात हमखास उत्पन्न मिळेल या अपेक्षेने शेतकरी हस्त बहार धरून बागांची बारकाईने काळजी घेतात. खत, औषधे, पाणी यांचे योग्य नियोजन करून बागा फुलोर्‍यात आलेल्या असताना गारपिटीने झोडपल्याने बहार धरल्यापासून केलेला लाखो रुपये खर्च काही क्षणात पाण्यात गेला आहे. वार्‍यामुळे अनेकांच्या बागा मुळासकट उखडून पडल्या आहेत. पिंपरखेड येथे शेतकरी अंकुश दाभाडे यांचा तोडणीला आलेला वालवडचा उभा बाग भुईसपाट झाला. सध्या पावसामुळे ऊसतोड ठप्प झाली आहे

  शिरूरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांनी प्रशासनाला स्थळ पाहणीचे आदेश दिले आहेत. तलाठी शांताराम सातपुते, ग्रामविकास अधिकारी राजेंद्र खराडे, कृषी पर्यवेक्षक अंकुश परांडे, कृषी सहाय्यक संतोष बेंद्रे ,तपेश समरीत हे नुकसानग्रस्त भागाची सोमवारी (दि. 28) पाहणी करीत होते. या परिसरातील शेतकर्‍यांच्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी टाकळी हाजीचे माजी सरपंच दामूशेठ घोडे यांनी केली आहे.

हेही वाचा :

 

Back to top button