चाकण : पुढारी वृत्तसेवा : महाळुंगे येथील हत्याप्रकरणी पोलिसांनी 10 जणांवर गुन्हे दाखल केले असून, सहा जणांची नावे निष्पन्न झाली आहेत. यातील पाच जणांना महाळुंगे पोलिसांनी सोमवारी (दि. 27) सायंकाळी उशिरा ताब्यात घेतले. पूर्ववैमनस्यातून सहा जणांनी मिळून रितेश संजय पवार (वय 31, रा. महाळुंगे इंगळे, ता. खेड) याच्यावर कोयत्याने सपासप वार करीत त्याचा निर्घृणपणे खून केला. तसेच त्याचा मित्र संदेश बापूराव भोसले (वय 21, सध्या रा. महाळुंगे, ता. खेड; मूळ रा. जत, जि. सांगली) याच्यावर कोयत्याने वार करीत तसेच लाकडी दांडक्याने मारहाण करीत खुनी हल्ला केल्याची घटना रविवारी (दि. 26) दुपारी साडेबाराच्या सुमारास महाळुंगे (ता. खेड) येथे प्रतीक गॅस रिपेअरिंग दुकानात घडली. याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात शंभू भोसले, अभी जावळे, वैभव आंधळे, विनोद बटलवार, शेखर नाटक, छोटा साकेत (सर्व रा, महाळुंगे, ता. खेड) या सहा जणांसह त्यांचे अन्य चार अनोळखी साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे; दरम्यान, सोमवारी रात्री उशिरा यातील पाच हल्लेखोरांना ताब्यात घेतले आहे. संदेश भोसले यांनी याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलिस या घटनेचा तपास करीत आहेत.
हेही वाचा :