Pune : नेरे केंद्रांतर्गत आढळल्या डेंग्यू, चिकुनगुनियाच्या अळ्या | पुढारी

Pune : नेरे केंद्रांतर्गत आढळल्या डेंग्यू, चिकुनगुनियाच्या अळ्या

भोर : पुढारी वृत्तसेवा :  नेरे (ता. भोर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत असणार्‍या गावातून घराघरांत कंटेनर सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात डेंग्यू व चिकुनगुनियाच्या अळ्या आढळल्याचे निष्पन्न झाले आहे. सकाळी ऊन, दुपारी ढगाळ व थंड हवामान; तर संध्याकाळच्या वेळी पावसाच्या सरी बरसत असल्याने वातावरण दूषित झाले असून, डासांची संख्या वाढत आहे. त्यामुळे नेरे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून नेरे, खानापूर, पोळवाडी, जेधेवाडी तसेच परिसरातील गावांमध्ये कंटेनर सर्व्हे करण्यात आला. यात नेरे गावात सर्वांत जास्त 12 टक्के डेंग्यू व चिकुनगुनियाच्या अळ्या सापडल्याचे वैद्यकीय कर्मचारी व अधिकार्‍यांच्या निदर्शनास आले.

बरेच दिवस घरातील भांडी, बॅरल, सिमेंटच्या टाक्यांमध्ये पाणी साठवून ठेवल्याने चिकुनगुनिया, डेंगूच्या अळ्या आढळल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी सांगितले. कंटेनर सर्वेक्षण जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पर्यवेक्षक सोना गावडे, आरोग्य सहायक जगन्नाथ खुडे, जी. टी. फुटाणे, सुरेश मळेकर, आरोग्यसेवक कृष्णांत जगताप, संतोष सोनवणे, हेमंत शिंदे, अक्षय बन्ने, सचिन गायकवाड यांनी केले.

वातावरणातील बदल आणि बरेच दिवस साठवून ठेवलेल्या पाण्यामुळे डेंग्यू, चिकुनगुनियाच्या डासांची उत्पत्ती होत असल्याने पाणी जास्त काळ संचय करू नये. आठवड्यातून एक कोरडा दिवस पाळावा. नागरिकांनी पाणी उकळून गरम करून प्यावे. डेंग्यू, चिकुनगुणियाचे आजार झाल्यास शासकीय रुग्णालयांमध्ये उपचार घेण्यासाठी यावे. ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांनी काळजी घ्यावी. आरोग्य खात्याच्या वतीने गावोगावी कीटक सर्वेक्षण करण्यात येत आहे. नागरिकांनी गटारे, डबकी वाहती करावीत. घराच्या छपरावरील तसेच शेजारील टायर-ट्यूबमध्ये साचलेले पाणी बाजूला काढून टाकावे. ग्रामपंचायतीने नळ पाणीपुरवठा आठवड्यातून दोन दिवस बंद ठेवून कोरडा दिवस पाळावा.
                                     – डॉ. मिलिंद अहिरे, वैद्यकीय अधिकारी, नेरे, ता. भोर

हेही वाचा :

Back to top button