Pune : लष्करात नोकरीच्या आमिषाने साडेआठ लाखांची फसवणूक | पुढारी

Pune : लष्करात नोकरीच्या आमिषाने साडेआठ लाखांची फसवणूक

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  लष्करात नोकरीच्या आमिषाने एकाची साडेआठ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आरोपीने लष्करात नोकरी मिळाल्याचे बनावट नियुक्तीपत्र दिले असून, अशा पद्धतीने अनेकांची फसवणूक केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. गणेश बाबूलाल परदेशी (रा. एनआयबीएम रस्ता, कोंढवा) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याबाबत कोंढवा भागात राहणार्‍या एका व्यक्तीने फिर्याद दिली आहे. तक्रारदाराचे कोंढवा भागात दुकान आहे. आरोपी परदेशी तक्रारदाराच्या दुकानात जायचा. त्यांची ओळख झाली. त्याने विधानभवनात कामाला असल्याची बतावणी तक्रारदाराकडे केली. लष्करातील बड्या अधिकार्‍यांशी ओळख असल्याची बतावणी करून तक्रारदाराच्या दोन मुलींना लष्करात कायमस्वरूपी नोकरी लावण्याचे आमिष परदेशीने दाखविले. मुलींना नोकरी लावण्यासाठी प्रत्येकी तीन लाख रुपये द्यावे लागतील, असे त्याने सांगितले. त्यानंतर तक्रारदाराने वेळोवेळी पाच लाख रुपये ऑनलाइन तसेच रोख पद्धतीने परदेशीला दिले.

तक्रारदाराच्या ओळखीतील काही जणांना त्याने लष्करात नोकरीचे आमिष दाखविले. त्यांच्याकडून त्याने पैसे घेतले. परदेशीने त्यांना गॅरिसन इंजिनिअरिंगचे बनावट नियुक्तीपत्र दिले. नियुक्तीपत्र मिळाल्यानंतर तक्रारदाराने चौकशी केली. तेव्हा नियुक्तीपत्र बनावट असल्याचे उघडकीस आले. फसवणूक झाल्यानंतर तक्रारदाराने पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला. परदेशीने तक्रारदारास आणखी काही जणांची फसवणूक केली असून, आतापर्यंत नोकरीच्या आमिषाने आठ लाख 32 हजार रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. पोलिस उपनिरीक्षक सोनवणे तपास करत आहेत.

हेही वाचा :

Back to top button