Pune : ससूनच्या भांडणात तिसर्‍याचा लाभ?

Pune : ससूनच्या भांडणात तिसर्‍याचा लाभ?

पुणे : पुढारी वृत्तसेवा : ससून सर्वोपचार रुग्णालयाच्या अधिष्ठातापदाचा पेच अजूनही सुटताना दिसत नाही. मुंबई उच्च न्यायालयाने डॉ. संजीव ठाकूर यांना पदमुक्त केले असले, तरी डॉ. विनायक काळे यांना रुजू होण्याबाबत कोणतेही आदेश दिलेले नाहीत. त्यामुळे 'दोघांचे भांडण, तिसर्‍याचा लाभ' अशी परिस्थिती निर्माण झाली असून, ससूनच्या डीनपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, हा प्रश्न अनुत्तरितच आहे. डॉ. काळे यांच्या ऐवजी मुंबई, नागपूर किंवा छत्रपती संभाजीनगर येथील व्यक्तीची डीन म्हणून नियुक्ती होणार असल्याचे समजते.

ससून रुग्णालयाचे तत्कालीन अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांची शासनाने 13 जानेवारी रोजी ससून रुग्णालयातील महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्थेच्या संचालकपदी तडकाफडकी बदली केली आणि सोलापूरच्या डॉ. वैंशपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे तत्कालीन अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांची वर्णी लागली. डॉ. काळे यांनी मानसिक आरोग्य संस्थेच्या संचालकपदावर रुजू न होता शासनाच्या या निर्णयाविरोधात 'मॅट'कडे दाद मागितली. तीन-चार महिन्यांच्या लढ्यानंतर 'मॅट' ने डॉ. काळे यांच्या बाजूने निकाल दिला.

डॉ. काळे पुन्हा ससूनच्या डीनपदावर रुजू होणार असे वाटत असतानाच डॉ. ठाकूर यांनी 'मॅट' च्या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. उच्च न्यायालयाने 10 नोव्हेंबर रोजी डॉ. ठाकूर यांना पदमुक्त केले. मात्र, डॉ. काळे यांना पुन्हा अधिष्ठातापदी रुजू होण्याबाबत कोणतेही निर्देश दिले नाहीत. न्यायालयाच्या निर्णयाच्या दुस-या दिवशीच डॉ. काळे ससूनमध्ये येऊन गेले. मात्र, अद्याप शासन निर्णय न आल्याने रुजू होण्यास काही कालावधी जाईल, असे वाटत होते. आता प्रशासकीय गोंधळ आणि अंतर्गत राजकीय संघर्ष यामुळे तिस-याच व्यक्तीच्या गळ्यात डीन पदाची माळ पडणार असल्याची चर्चा आहे. डॉ. काळे यांनी शासनाच्या निर्णयाविरोधात भूमिका घेतल्याने त्यांना 'साईड पोस्टिंग' मिळणार असल्याचेही बोलले जात आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news