Pune : शिक्रापूरला भुसा घेऊन जाणारी ट्रॉली उलटली | पुढारी

Pune : शिक्रापूरला भुसा घेऊन जाणारी ट्रॉली उलटली

तळेगाव ढमढेरे : पुढारी वृत्तसेवा :  पुणे-नगर महामार्गाच्या शिक्रापूर येथील मुख्य चौकातच साखर कारखान्याहून उसाचा भुसा घेऊन जाणार्‍या ट्रॅक्टरची ट्रॉली चाक निखळल्यामुळे रस्त्याच्या मध्यभागी उलटली. ही दुर्घटना बुधवारी (दि. 22) रात्री पावणेबाराच्या सुमारास घडली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून, एक तासाने वाहतूक कोंडी सुरळीत करण्यात यश आले. शिक्रापूर (ता. शिरूर) येथे पुणे-नगर महामार्गावरून ट्रॅक्टर (एमएच 42 वाय 2570) ला दोन ट्रॉली जोडून व्यंकटेशकृपा शुगर मिल्स या साखर कारखान्यावरून उसाचा भुसा घेऊन रात्रीच्या सुमारास ट्रॅक्टर शिक्रापूरमार्गे टेंभूर्णी येथे जात होता. अचानकपणे ट्रॉलीचे चाक निखळल्याने ट्रॅक्टरसह ट्रॉली रस्त्याच्या मध्यभागी उलटली. त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली.

संबंधित बातम्या :

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिस हवालदार सचिन होळकर, अमोल दांडगे, लहानू बांगर यांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रसंगी शुभम वाघ, रोहन गुप्ता, रोहित थोरात, विशाल लोखंडे आदी युवकांच्या मदतीने रस्त्यावर उलटलेली ट्रॅक्टर व ट्रॉली रस्त्यावरून बाजूला केली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून, ट्रॅक्टरसह ट्रॉलीचे नुकसान झाले. मात्र, या वेळी कंपन्यांच्या सुटलेल्या वाहनांना या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. नागरिक व पोलिसांच्या मदतीने तब्बल एक तासाने वाहतूक सुरळीत झाली.

 

Back to top button