

वडगाव मावळ : पुढारी वृत्तसेवा : भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस अशा दोन प्रमुख पक्षांचे जिल्ह्याचे पदाधिकारी असलेल्या दोन गाव कारभार्यांनी एकत्र येऊन ग्रामपंचायतीची निवडणूक पूर्णपणे बिनविरोध केली; तसेच बुधवार (दि. 22) झालेली उपसरपंचपदाची निवडही बिनविरोध केली. त्यामुळे राजकारणात एकमेकांशी संघर्ष असलेल्या या दोन पदाधिकार्यांनी गावच्या विकासासाठी एकत्र येत गावचा एकोपा राखण्याचे काम केल्याने त्यांचे कौतुक होत आहे.
पुणे जिल्हा राष्ट्रवादी (अजित पवार गट) युवकचे जिल्हाध्यक्ष सचिन घोटकुले व पुणे जिल्हा भाजपचे कार्याध्यक्ष बाळासाहेब घोटकुले या दोन पदाधिकार्यांनी यासाठी पुढाकार घेतला असून गोदामचे संस्थापक नितीन घोटकुले यांनीही विशेष प्रयत्न केले. सचिन घोटकुले व बाळासाहेब घोटकुले हे दोघेही दोन प्रमुख पक्षांचे प्रमुख पदाधिकारी असल्याने त्यांच्यामध्ये मोठा राजकीय संघर्ष असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांना एकमेकांचे स्पर्धक म्हणून ओळखले जाते; परंतु गावच्या हितासाठी या दोन पदाधिकार्यांनी एकत्र येऊन ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक पूर्ण बिनविरोध करून नवा आदर्श समाजापुढे ठेवला.
या वेळी ग्रामपंचायत सदस्य नितीन साळुंखे, जयश्री घोटकुले, संतोष कदम, तानाजी घोटकुले, वंदना घोटकुले मच्छिंद्र म्हस्के, प्रियंका घोटकुले, अश्विनी वाघमारे उपस्थित होते. नायब तहसीलदार अमोल पाटील यांच्या मार्गर्शनाखाली तलाठी सचिन जाधव, ग्रामसेवक सुनीता चौधरी यांनी कामकाज पाहिले.
सरपंच सुवर्णा घोटकुले यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार (दि. 22) झालेल्या विशेष सभेत उपसरपंच पदासाठी घेण्यात आलेल्या निवडणूक प्रक्रियेत सर्वानुमते पल्लवी संतोष वाघमारे यांचा एकमेव अर्ज दाखल करण्यात आला व उपसरपंच पदाचीही निवडणूक बिनविरोध करण्यात आली.