Pimpri News : पीएमआरडीए जागेसाठीे जरांगे-पाटील यांना साकडे | पुढारी

Pimpri News : पीएमआरडीए जागेसाठीे जरांगे-पाटील यांना साकडे

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : निगडी येथील भक्ती-शक्ती समूह शिल्पालगतची पीएमआरडीएची पेठ क्रमांक 24 येथील जागा शिवजयंती उत्सव व इतर सर्व सार्वजनिक उपक्रमासाठी कायमस्वरुपी राखीव ठेवण्याचा सकारात्मक निर्णय व्हावा, यासाठी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांना साकडे घालण्यात आले आहे. माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी भक्ती-शक्ती शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने कल्याण येथे मंगळवारी (दि. 21) जरांगे-पाटील यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. त्या वेळी त्यांच्या समवेत वैभव जाधव, सचिन जाधव आदी उपस्थित होते.

भक्ती-शक्ती समूह शिल्पालगतच्या पेठ क्रमांक 24 मधील जागेत गेल्या 20 ते 25 वर्षापासून महानगरपालिका व समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जयंती उत्सव होत आहे. पीएमआरडीएकडून ही जागा लिलाव करून विकसकांना देण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांची देखील यासाठी यापुर्वी भेट घेतली आहे. शिवजयंती उत्सवासाठी जागा देण्याबाबत महानगर आयुक्त राहुल महिवाल यांना मुख्यमंत्र्यांनी तोंडी सूचना दिलेल्या आहेत. त्यानंतर महिवाल यांनी माता अमृतानंदमयी शाळेलगतची यमुनानगर येथील 1 एकर जागा या कार्यासाठी महापालिकेला देण्याचा निर्णय जाहीर केला.

ही जागा भक्ती-शक्ती समूह शिल्पासून खूप लांब व लोकवस्तीत आहे. त्यामुळे ही जागा वरील उद्देशासाठी उपयोगाची नाही. पेठ क्र. 24 मधील जागाच मिळायला हवी, अशी आमची मागणी आहे. पीएमआरडीची संबंधित जागा सार्वजनिक उपक्रमासाठी कायमस्वरूपी राखीव राहावी, या मागणीसाठी सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाच्या (पिंपरी चिंचवड शहर) वतीने ठराव केलेला आहे.

तसेच भक्ती-शक्ती शिवजयंती उत्सव समिती, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती उत्सव समिती यांच्या वतीने देखील ही जागा कायमस्वरूपी राखीव राहावी, असा प्रस्ताव मंजूर केलेला आहे. तरी आपण या गंभीर प्रकरणात विशेष लक्ष घालून छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम महाराज, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आदी संत व महामानवाच्या जयंती उत्सवासाठी व इतर सर्व उपक्रमासाठी ही जागा कायमस्वरूपी राखीव राहावी, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत.

हेही वाचा

परदेशी पक्ष्यांच्या वाटेत जल प्रदूषणाचा अडथळा !

Pimpri News : फटाक्यांचा आवाज पोहचला 99 डेसिबलपर्यंत

Dhangar Reservation : खंडेरायाची पूजा करून धनगर आरक्षणाचा संकल्प

Back to top button