Pune : वाडा पुनर्वसन गावाच्या रस्त्याची दुरवस्था | पुढारी

Pune : वाडा पुनर्वसन गावाच्या रस्त्याची दुरवस्था

कोरेगाव भीमा : पुढारी वृत्तसेवा :  वाडा पुनर्वसन (ता. शिरूर) येथील मुख्य रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झालेली आहे. रस्त्यावर यामुळे अनेक छोटे-मोठे खड्डे पडले आहेत. वाहन चालवताना रस्त्यातील खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात दोन वाहनांमध्ये एकमेकांना ठोकर बसून अपघात घडत असल्याने वाहनचालक संताप व्यक्त करू लागले आहेत. वाडा पुनर्वसन गावात प्रवेश करण्यासाठी असलेला हा मुख्य रस्ता वाडा पुनर्वसन गाव हद्दीत नसून तो कोरेगाव भीमा गावात मोडत असल्याचे वाडा पुनर्वसनचे ग्रामसेवक विमल आव्हाड यांनी सांगितले. तर, हा रस्ता जिल्हा परिषद गटात मोडत असल्याने ग्रामपंचायतीद्वारे या रस्त्याचे काम करता येत नसल्याचे कोरेगाव भीमाचे सरपंच विक्रम गव्हाणे यांनी सांगितले.

संबंधित बातम्या : 

या रस्त्याच्या आजूबाजूने, तसेच गावाच्या पूर्व दिशेला अनेक छोटे-मोठे कारखाने आहेत. यामुळे वारंवार छोट्या-मोठ्या वाहनांची वर्दळ कारखान्याकडे याच रस्त्यावरून कायम असते. यामुळेच रस्त्याची दुरवस्था लवकर होत असते, असा आरोप येथील स्थानिक ग्रामस्थ व वाहनचालकांनी केला आहे. वाडा पुनर्वसन ग्रामपंचायत व कोरेगाव भीमा ग्रामपंचायत या दोन्ही गावांनी मिळून योग्य तो पाठपुरावा करून रस्त्याची दुरुस्ती लवकरात लवकर करावी, अशी येथील वाहनचालक व ग्रामस्थांच्या वतीने मागणी होत आहे. या समस्याबाबत कोरेगाव भीमाचे ग्रामसेवक रतन दवणे यांच्याशी चर्चा केली असता, लवकरात लवकर सदर रस्त्यात पडलेले खड्डे मुरुमाने भरून सुरळीत करू, असे त्यांनी सांगितले.

Back to top button