India vs Australia 1st T20I | भारत -ऑस्ट्रेलिया यांच्यात आज पहिली टी-२० लढत, युवा खेळाडूंची कांगारुंसमोर अग्निपरीक्षा | पुढारी

India vs Australia 1st T20I | भारत -ऑस्ट्रेलिया यांच्यात आज पहिली टी-२० लढत, युवा खेळाडूंची कांगारुंसमोर अग्निपरीक्षा

विशाखापट्टणम : वृत्तसंस्था, ऑस्ट्रेलियाविरुद्ध आजपासून खेळवल्या जाणाऱ्या ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेत मैदानात उतरताना हंगामी कर्णधार सूर्यकुमार यादवसमोर अलीकडील अपयश बाजूला सारून नव्याने श्रीगणेशा करण्याचे आव्हान असणार आहे. भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यात आज पहिली टी-२० लढत होत असून, या मालिकेसाठी भारताने जनरेशन नेक्स्ट स्टार्सना संधी दिली आहे. आजची पहिली लढत सायंकाळी ७ पासून खेळवली जाणार आहे. (India vs Australia 1st T20I)

T 20 Series : तगडे आव्हान प्रस्थापित करण्याची क्षमता राखून

‘आयसीसी’ वन-डे विश्वचषक स्पर्धा संपन्न झाल्यानंतर अवघ्या ९६ तासांच्या आतच भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-२० मालिकेला प्रारंभ होत आहे. त्यामुळे सूर्यकुमार यादवसमोर अपयशाचे आत्मचिंतन करण्यासाठीही पुरेसा अवधी हाताशी नव्हता; पण येथे तो आपल्या प्रथम पसंतीच्या क्रिकेट प्रकारात खेळणार असल्याने त्याला सत्वर सूर सापडणे अपेक्षित आहे. कर्णधार या नात्याने सूर्यकुमार यादवने मालिका जिंकून देणे क्रमप्राप्त असेलच; पण त्याही शिवाय पुढील वर्षी जून-जुलैमध्ये होणाऱ्या ‘आयसीसी’ टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर युवा खेळाडूंकडून दर्जेदार कामगिरी करवून घेणेदेखील तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे. पुढील वर्षातील टी-२० विश्वचषक स्पर्धा विंडीज व अमेरिकेत खेळवली जाणार आहे. यशस्वी जैस्वाल, रिंकू सिंग, तिलक वर्मा, जितेश शर्मा, मुकेश कुमार यांनी मागील काही महिन्यांपूर्वी आंतरराष्ट्रीय पदार्पण जरूर केले आहे; पण त्यांची खरी अग्निपरीक्षा येथे सुरू होणार आहे. तगड्या ऑस्ट्रेलियन संघात ट्रॅव्हिस हेड, ग्लेन मॅक्सवेल, लेगस्पिनर अॅडम झम्पा व माजी कर्णधार स्टिव्ह स्मिथ या वर्ल्डकप हिरोंचा प्रामुख्याने समावेश आहे. याशिवाय, मार्कस स्टोईनिस, नॅथन इलिस, टीम डेव्हिड यांच्यासारखे ‘आयपीएल’ परफॉर्मर्सही संघात असतील. आता या संघात अव्वल दर्जाचे पेसर्स नाहीत. मात्र, तरीही मॅथ्यू वेडच्या नेतृत्वाखाली हा संघ भारतासाठी तगडे आव्हान प्रस्थापित करण्याची क्षमता राखून आहे.

२०२२ टी-२० विश्वचषक स्पर्धेतील सेमीफायनल एक्झिटनंतर कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली व के. एल. राहुल यांना या क्रिकेट प्रकारासाठी विचारात घेतले जात नाही. त्या पार्श्वभूमीवर पुढील टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी भारताचा भर युवा खेळाडूंवरच असेल, हे सुस्पष्ट आहे. यापूर्वी अल्प संधी मिळाली, त्यावेळी रिंकू सिंगप्रमाणेच यशस्वी जैस्वाल, तिलक वर्मा, मुकेश कुमार यांनी उत्तम चुणूक दाखवली. मात्र, हॉग्नु आशियाई स्पर्धेत पदार्पण नोंदवणाऱ्या जितेशला इशान किशन संघात असल्याने आणखी बरीच प्रतीक्षा करावी लागू शकते, असे सध्याचे चित्र आहे.

विंडीज, आयर्लंड व आशियाई स्पर्धेतील साधारण दर्जाच्या गोलंदाजांवर तुटून पडणाऱ्या या युवा खेळाडूंची येथे पारख होईल आणि या मालिकेतील कामगिरीवरच त्यांचा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विदेशी भूमीत, तर अफगाणविरुद्ध मायभूमीत होणाऱ्या मालिकेसाठी विचार होऊ शकेल. या ५ सामन्यांच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन जलद गोलंदाजी ताफ्यात केन रिचर्डसन, नॅथन इलिस, सीन बॉट, डावखुरा सीमर जेसॉन बेहरनडॉर्फ यांचा समावेश आहे. ‘आयपीएल २०२३’ पूर्वी भारतीय संघ एकूण ११ टी-२० सामने खेळणार आहे. त्यानंतर दोन महिने ‘आयपीएल’ स्पर्धा रंगेल व त्यानंतर भारतीय संघ टी-२० वर्ल्डकप मोडमध्ये येणे अपेक्षित आहे.

खरा कस भारतीय गोलंदाजांचा!

या मालिकेत भारतीय गोलंदाजांचा प्रामुख्याने कस लागेल, असे चित्र आहे. निवडकर्त्यांना युझवेंद्र चहलच्या पलीकडे पाहायचे असल्याने रवी बिष्णोईला अधिक संधी मिळेल, असे संकेत आहेत. याशिवाय, प्रसिद्ध कृष्णा, अवेश खान, मुकेश खान व अर्शदीप सिंग यांना मालिकेदरम्यान रोटेट केले जाण्याची शक्यता आहे. घोंडशिरेच्या दुखापतीतून सावरलेला अष्टपैलू अक्षर पटेल फलंदाजी व गोलंदाजीच्या दोन्ही आघाड्यांवर महत्त्वाचा खेळाडू असल्याने त्याला मालिकेत पाचही सामन्यात खेळवले जाईल, असे अपेक्षित आहे.

भारताच्या टी-२० संघात चक्क ७ डावखुरे फलंदाज

भारताच्या वन-डे संघात डावखुऱ्या फलंदाजांची बरीच वानवा आहे. मात्र, त्या तुलनेत टी-२० संघात थोडेथोडके नव्हे,
तर चक्क ७ फलंदाज डावखुरे आहेत.

यशस्वी जैस्वाल, इशान किशन, तिलक वर्मा, रिंकू सिंग यांच्यासह अष्टपैलू अक्षर पटेल, शिवम दवे, वॉशिंग्टन सुंदर यांचा यात समावेश आहे. टी-२० थिंक  टॅकच्या दृष्टीने रिंकू व जितेश हे दोन स्पेशालिस्ट फिनिशर असल्याने या दोघांपैकी एकाचा अंतिम एकादशमधील समावेशअनिवार्य असणार आहे. (India vs Australia 1st T20I)

आज पहिला टी-२०

● स्थळ : विशाखापट्टणम
● वेळ : सायं. ७.०० वा. पासून
• थेट प्रक्षेपण : स्पोर्टस् १८
• लाईव्ह स्ट्रिमिंग: जिओ सिनेमा

हेही वाचा 

Back to top button