त्या कैदयाला आई- वडिलांनीच परत कारागृहात केले हजर | पुढारी

त्या कैदयाला आई- वडिलांनीच परत कारागृहात केले हजर

पुणे : पुढारी वृत्तसेवा : येरवडा येथील खुल्या कारागृहातून पळ काढलेला कैदी आशिष भरत जाधव हा स्वतः बुधवारी (दि.22) सकाळी साडे सात वाजताच्या सुमारास कारागृहात परतला. त्याचे आई-वडील त्याला घेऊन आले होते. आईला हृदयविकाराचा झटका आल्याने तिला भेटण्यासाठी आशिष याने पलायन केले असावे असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. आशिष याने सोमवारी (दि. 20 नोव्हेंबर) येरवडा येथील खुले जिल्हा कारागृहातुन पलायन केले होते. याप्रकरणी, येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तो हजर झाल्यानंतर याबाबतची माहिती येरवडा पोलिसांना देण्यात आली. येरवडा पोलिसांनी आशिष याला ताब्यात घेतले.

संबंधित बातम्या :

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, वारजे माळवाडी परिसरात 2008 मध्ये झालेल्या खूनाच्या गुन्ह्यात आशिष जाधव याला 2015 मध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यावेळी पासून जाधव हा येरवडा कारागृहात शिक्षा भोगत होता. वर्तवणुक चांगली वाटल्याने त्याला 16 ऑगस्ट 2022 पासून जाधवची खुल्या कारागृहात रवानगी केली होती. जाधवला कारागृहातील अन्नधान्य विभागात काम देण्यात आले होते. दरम्यान, सोमवारी त्याने येरवडा खुले कारागृह येथून पलायन केले होते. आशिष जाधव यांचा शोध घेण्यासाठीची येरवडा पोलिसांनी त्याच्या नातेवाईकांशी संपर्क साधला होता. यावेळी आशिष जाधवच्या आईला हृद्यविकाराचा झटका आल्याचे सांगितले. जाधव याने आईच्या काळ्जीपोटी कारागृहातून पलायन केले होते.

बुधवारी (दि. 22) रोजी सकाळी 7.30 च्या दरम्यान आशिष जाधव यांच्या आई वडिलांनी त्याला कारागृहात हजर केले. त्यावेळी आशिष जाधव आणि त्याच्या आई वडिलांना प्रतिक्षालयात थांबवण्यात आले. यानंतर याची माहिती येरवडा पोलिसांना देण्यात आली. येरवडा पोलिसांनी पलायन करणार्‍या आशिष जाधव याला ताब्यात घेतले.

मध्यवर्ती कारागृहातून नव्हे तर खुले कारागृहातून पलायन आशिष जाधव या बंद्याने येरवडा मध्यवर्ती कारागृहातून पलायन केले नाही तर खुले कारागृहातून पलायन केले. येरवडा खुले जिल्हा कारागृह ही किमान सुरक्षा असलेली शासकीय संस्था असून येथून बंद्याने पलायन करणे कठीण नाही. आशिष जाधव या बंद्याला आईची काळजी वाटल्याने तो पळून गेला होता. मात्र आईची तब्येत बरी असल्याने तो परत कारागृहात दाखल झाला. येरवडा मध्यवर्ती कारागृह आणि येरवडा खुले जिल्हा कारागृह हे वेगवेगळ्या शासकीय संस्थान आहेत.

Back to top button