दूध दरात वाढ होण्याची शक्यता | पुढारी

दूध दरात वाढ होण्याची शक्यता

इंदापूर : पुढारी वृत्तसेवा : राज्यात उद्भवलेली दुष्काळसदृश परिस्थिती आणि दुधाच्या दरात होत असलेली कमालीची घट लक्षात घेऊन दूधगंगाचे संचालक राजवर्धन पाटील यांनी दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची मुंबईत भेट घेतली. या वेळी माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील उपस्थित होते. उत्पादनावर होणारा खर्च यामुळे दुधाच्या दरावर परिणाम होत आहे. उत्पादनावर होणार्‍या जास्त खर्चामुळे आता दुधाचे दर वाढविले पाहिजेत, अशी अनेक शेतकर्‍यांची मागणी असून, शासनाने त्वरित या सर्व गोष्टी विचारात घेता दूध दराचा प्रश्न लवकर मार्गी लावण्याची मागणी या वेळी पाटील यांनी केली.

संबंधित बातम्या :

या भेटीत दूध दरवाढीचीदेखील चर्चा झाली. दूध दरात 7 रुपयांची वाढ होणार असल्याची माहिती समोर येत आहे. दूधगंगा दूध उत्पादक संघाच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यात प्रतिदिन 1 लाख लिटर दुधाचे संकलन करण्यात येते. प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष हजारो युवकांना रोजगार व व्यावसायिक हातभार लावण्यात व दूध व्यवसायाला चालना देण्यात दुधगंगा महत्त्वाची भूमिका बजावत आहे, यामुळेच दूध दरवाढीसंदर्भात राजवर्धन पाटील यांनी दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची भेट घेऊन सकारात्मक चर्चा केली. सदर भेटीत झालेल्या चर्चेनुसार दूध दरवाढीच्या प्रश्नांवर दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करून दूध दरात प्रतिलिटर 7 रुपयांच्या वाढीबाबत निर्णय घेण्याबाबतची सकारात्मकता दर्शवली असल्याची माहिती दूधगंगेचे संचालक राजवर्धन पाटील यांनी दिली.

Back to top button