Drugs Case : येरवडा कारागृह अधीक्षक ललितवर मेहरबान ! | पुढारी

Drugs Case : येरवडा कारागृह अधीक्षक ललितवर मेहरबान !

पुणे : पुढारी वृत्तसेवा : ड्रग तस्कर ललित पाटीलला ससून रुग्णालयात ठेवण्याची शिफारस खुद्द डॉ. संजीव ठाकूर यांनीच केली होती, हे उघड झाले. त्यानंतर आता कारागृह अधीक्षकांसह प्रशासनाने पाटीलला अभय दिल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. कोणताही गंभीर आजार नसतानाही पाटीलला ससून रुग्णालयात 15 दिवस उपचारांसाठी ठेवावे, असे पत्र कारागृह अधीक्षकांनी दिल्याचे निदर्शनास आले आहे.

येरवडा कारागृह प्रशासनाने 3 जून 2023 रोजी ससूनच्या वैद्यकीय अधीक्षकांना पत्र पाठविले होते. ललित पाटीलला ससून रुग्णालयात दाखल करून घेण्यात यावे, तसेच त्याला किमान 15 दिवस ससून रुग्णालयात ठेवण्यात यावे, असे पत्रात नमूद करण्यात आले होते. हे पत्र उघडकीस आल्याने कारागृह प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ससूनमधून ललितला कारागृहात नेण्यासाठी बंदोबस्त उपलब्ध नसल्याचे पत्रात म्हटले आहे. या पत्रावर येरवडा कारागृहातील मुख्य वैद्यकीय अधिकार्‍यांसह वरिष्ठ अधिकार्‍यांची स्वाक्षरी आहे.

ललित पाटील प्रकरणात सहायक पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षकासह, नऊ पोलिस कर्मचार्‍यांना पोलिस सेवेतून निलंबित करण्यात आले. या प्रकरणात दोन पोलिस कर्मचार्‍यांना अटक करण्यात आली असून, त्यांना सोमवारी रात्री बडतर्फ करण्याचे आदेश देण्यात आले. या प्रकरणाचा सखोल तपास करण्याची मागणी काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडे केली आहे. या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

हेही वाचा

Pune News :ससून अधिष्ठातापद; अध्यादेशाची प्रतीक्षाच

वुली मॅमथ पुन्हा होणार जिवंत?

Pune News : कचरा जाळल्यामुळे वायु प्रदूषणाला आमंत्रण

Back to top button