बारामतीत आंदोलने झाली उदंड ; आरक्षणापाठोपाठ ऊस आंदोलनही पेटण्याची शक्यता | पुढारी

बारामतीत आंदोलने झाली उदंड ; आरक्षणापाठोपाठ ऊस आंदोलनही पेटण्याची शक्यता

बारामती : पुढारी वृत्तसेवा :  बारामती तालुक्यात सध्या आंदोलनांचा सुकाळ झाला आहे. विविध आंदोलनांमुळे बारामती तालुका गेल्या दोन महिन्यांपासून चर्चेत आहे. मराठा आरक्षण आंदोलनानंतर आता धनगर समाजाचे आरक्षण आंदोलन सुरू आहे. ऊसदराची कोंडी फुटली नाही, तर ऊस आंदोलनही नजीकच्या काळात पेटण्याची शक्यता आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी बारामती येथे मोठी सभा घेतली. यानंतर पुन्हा ते राज्याचा दौरा करत आहेत. नुकतेच त्यांनी सुपे येथे सभा घेतली. धनगर समाजाच्या वतीने धनगर समाजाला एस.टी. प्रवर्गात आरक्षण मिळावे यासाठी चंद्रकांत वाघमोडे हे गेल्या दहा दिवसांपासून बारामती येथील प्रशासकीय भवन येथे उपोषणास बसले आहेत.

मराठा व धनगर समाजाच्या वतीने आरक्षण मिळावे यासाठी दोन्हीही समाज आक्रमक झालेले चित्र बारामती तालुक्यात पाहायला मिळत आहे. यामुळे बारामती तालुक्यात धुसफूस निर्माण झाली आहे. दोन्ही समाजाच्या वतीने बारामती बंदची हाक देण्यात आली होती. शहरातील सर्व व्यावसायिकांनी यासाठी पाठिंबा दर्शवत बारामती दोनवेळा बंद ठेवण्यात आले. मराठा आरक्षणासाठी नेत्यांना गाव बंदी करण्यात आली होती. अजूनही ठिकठिकाणी या संदर्भातील बॅनर तसेच आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही मराठा आरक्षणाच्या संदर्भात तरुणांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. दोनवेळा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर मराठा व धनगर समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. तरडोली व कोर्‍हाळे येथे दूध दरवाढीसाठी तरुणांनी एकत्र येत साखळी उपोषण केले. प्रशासनाने यासाठी फारसा प्रतिसाद दिला नसल्याने भविष्यात दूध आंदोलन व्यापक स्वरूप घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. चार्‍याची निर्माण झालेली टंचाई, पशुखाद्याचे वाढलेले दर त्यामुळे दुधाला किमान 40 रुपये दर देण्याची मागणी तरुण करत आहेत. दूध धंदा अडचणीत आला असल्याने त्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबांची वाताहत होऊ लागली आहे. दूध संस्था 27 ते 32 रुपये पर्यंतच दर देत असल्याने शेतीला जोडधंदा म्हणून केला जाणार दुग्ध व्यवसाय अडचणीत आला आहे.

ऊसदर आंदोलनाचा इशारा
बारामती तालुक्यात या अगोदर ऊसदरासाठी अनेकदा जोरदार आंदोलन झाले होते. ऊसदराबाबतीत सोमेश्वर व माळेगाव कारखाने राज्यात उच्चांकी दर देण्यास सरस ठरल्यामुळे या ठिकाणी होणारे शेतकरी संघटनेचे आंदोलन गेल्या काही वर्षांपासून थांबलेले दिसत आहे. परंतु आता पहिला हप्ता 3300 रुपये देण्याची मागणी शेतकरी कृती समितीने केली आहे. ही मागणी मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.

पोलिसांची दमछाक
गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या विविध आंदोलनांमुळे पोलिस प्रशासनाची मात्र दमछाक होताना दिसत आहे. ऐन दिवाळी सणातसुद्धा पोलिसांना सतर्क राहावे लागले. सर्व प्रमुख कार्यक्रम तसेच नेत्यांच्या सुरक्षेची जबाबदारी पोलिस प्रशासनावर आहे. बारामतीत पवार कुटुंब असल्याने तर हा ताण आणखी वाढत आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह त्यांचे कुटुंब आणि निवासस्थानाची सुरक्षा महत्त्वाची असल्याने पोलिसांना त्यासाठी सदैव सज्ज राहावे लागत आहे.

हेही वाचा :

 

Back to top button