बाजारभाव नाही ! कोथिंबिरीच्या पिकात शेतकर्‍यांनी सोडली मेंढरं | पुढारी

बाजारभाव नाही ! कोथिंबिरीच्या पिकात शेतकर्‍यांनी सोडली मेंढरं

नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा :  गिर्‍हाईकच नसल्यामुळे कोथिंबीर पिकाचे बाजारभाव पडले असून शेतकर्‍यांनी अक्षरशः या पिकामध्ये मेंढरं सोडली आहेत. यंदाच्या वर्षी शेतकरी मोठ्या संकटाचा सामना करतोय. शेतामध्ये केलेल्या कोणत्याच पिकाला योग्य बाजारभाव मिळत नाहीत. कांद्याचे बाजारभाव सध्या आता कुठेतरी वाढायला लागलेत. परंतु इतर पिकाला बाजारभाव नसल्यामुळे बळीराजाचे ‘अर्थकारण‘ पूर्णपणे कोलमडले आहे. जगाचा पोशिंदा विविध संकटांचा सामना सध्या करतोय. शेतकर्‍यांपुढे सध्या विविध संकटे उभी राहिली आहेत. कोथिंबिरीला एका जोडीला अवघा एक रुपया बाजारभाव मिळत असल्यामुळे कोथिंबीर काढणं ते बाजारात विक्रीला नेणं हे शेतकर्‍याला परवडत नसल्यामुळे शेतकर्‍यांनी या पिकामध्ये मेंढरं सोडली आहेत.

संबंधित बातम्या :

जुन्नर तालुक्यातील काळेवाडी येथील दीपक बेल्हेकर या शेतकर्‍याने एक एकर कोथिंबिरीच्या शेतामध्ये मेंढरं सोडली आहेत. पंधरा दिवसांपूर्वी या शेतकर्‍याची कोथिंबीर पावणेदोन लाख रुपयाला व्यापार्‍यांनी मागितली होती. परंतु आपल्या कोथिंबिरीचे चार पैसे अधिक होतील या आशेने त्यांनी कोथिंबीर विकली नव्हती. परंतु आता बाजारभाव नसल्यामुळे अक्षरशः शेतकर्‍याला या पिकामध्ये मेंढरं सोडावी लागली आहेत. जगाचा पोशिंदा सध्या मात्र मोठ्या संकटात सापडला आहे. खते, औषधे, मजुरी याचे वाढलेले भरमसाठ दर यामुळे अक्षरशः शेतकरी मेटाकुटीला आला आहे. दरम्यान शेतकरी आर्थिक संकटात असल्यामुळे आपल्या घरातील कच्चीबच्ची कशी जगवायची असा यक्ष प्रश्न त्याच्यापुढे निर्माण झाला आहे. मराठवाडा भागांमध्ये शेतकरी आत्महत्या करीत असून आता इकडेदेखील आम्हाला आत्महत्या करण्याची पाळी आली आहे, अशी भावना शेतकरी व्यक्त करत आहेत.

Back to top button