पुणे जिल्ह्यात दुष्काळीस्थितीमुळे ऊसगाळप कमी होणार | पुढारी

पुणे जिल्ह्यात दुष्काळीस्थितीमुळे ऊसगाळप कमी होणार

पुणे : पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात 2023-24 च्या हंगामात 1 कोटी 51 लाख 90 हजार टनाइतक्या ऊसगाळपाचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, दुष्काळी स्थितीमुळे अपेक्षेपेक्षा कमी ऊसगाळप होण्याची दाट शक्यता कारखान्यांकडून वर्तविण्यात येत आहे. त्यातही ऊसगाळप हंगाम सुरू होऊनही दैनंदिन ऊसगाळप अहवाल आयुक्तालय अथवा प्रादेशिक सह संचालक कार्यालयास कळविण्याचा विसर कारखान्यांना पडला आहे. राज्यात 1 नोव्हेंबरपासून हंगाम सुरू झालेला आहे. तर जिल्ह्यातील 6 सहकारी आणि 4 खासगी मिळून 10 साखर कारखान्यांचा हंगाम सुरू झाला आहे.

तर 16 नोव्हेंबरअखेरच्या ताज्या अहवालानुसार कारखान्यांनी सुमारे 8 लाख 29 हजार 165 टन उसाचे गाळप पूर्ण केले आहे. तर 7.65 टक्के सरासरी उतार्‍यानुसार 6 लाख 34 हजार 270 क्विंटलइतके साखरेचे उत्पादन हाती आले आहे. ऊसगाळपात बारामती अ‍ॅग्रो या खासगी साखर कारखान्याने प्रथमपासूनच आघाडी घेतलेली आहे. या कारखान्यांची दैनिक ऊसगाळप क्षमता 18 हजार टनाइतकी आहे. या कारखान्याने 2 लाख 560 टन उसाचे गाळप पूर्ण केले आहे. तर 5.87 टक्के सरासरी उतार्‍यानुसार 1 लाख 17 हजार 650 क्विंटलइतके साखरेचे उत्पादन हाती आले आहे. तर सोमेश्वर आणि माळेगाव साखर कारखान्यांकडून प्रत्येकी एक लाख टनांहून अधिक ऊसगाळप पूर्ण झाले आहे.

 

“जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडून ऊसगाळप सुरू झाले आहे. साखर कारखान्यांनी हंगामपूर्व आढावा बैठकांमध्ये सुरुवातीचा ऊसगाळपाचा वर्तविलेल्या अंदाजापेक्षा 8 ते 10 टक्क्यांनी ऊस उत्पादन घटण्याची शक्यता आहे. दुष्काळी स्थितीमुळे ऊसगाळप कमी होऊन साखर उत्पादनही घट होईल, असे चित्र पहिल्या पंधरवड्यात दिसून येत आहे.
                             -नीलिमा गायकवाड, प्रादेशिक साखर सह संचालक, पुणे.

 

Back to top button