पुणे : दिवाळीच्या फटाक्यांच्या आतषबाजीने रविवारी कोणतीच कसर सोडली नाही. फटाके उडवणार नाही, असे म्हणत प्रत्येक गल्लीबोळात जोरदार आतषबाजी झाल्याने रविवारी शहर प्रदूषित झाले. पण, सोमवारी त्याने कहर केला. दुपारी तीन वाजता केलेल्या सर्वेक्षणात शहराची हवा अतिखराब गटात गेली. पुणे शहराने दिवाळी प्रदूषणात दिल्लीपाठोपाठ दुसरा क्रमांक पटकाविला आहे. तसेच, शहरात अतिनील किरणांचाही धोका वाढल्याने आजारी नागरिकांनी उन्हात फिरू नये, असा इशारा सफर संस्थेने त्यांच्या अहवालात दिला आहे.
रविवारी पुणेकरांनी लक्ष्मीपूजन थाटामाटात केले. सायंकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत शहरात फटाके फुटतच होते. रात्री शहरात इतका धूर झाला होता, की प्रत्येक घर धुराने भरून गेले. आजारी व्यक्तीसह सुदृढ लोकांनीही या आतषबाजीचा त्रास झाला. पृश्वी विमान मंत्रालयाच्या अखत्यारित येणार्या सफर या संस्थेने लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच्या प्रदूषणाचा अहवाल सोमवारी दिला.
तो अंगावर काटे आणणाराच होता. पुणे शहर दिल्लीपाठोपाठ अतिप्रदूषित ठरले. इतके फटाके पुणेकरांनी फोडले. रविवारी झालेले प्रदूषण वातावरणात मिसळण्यास वेळ लगतो. त्यामुळे सफर संस्थेने रविवारचे प्रदूषण रात्री 1 ते पहाटे 6 या वेळेत मोजले. तेव्हा शहराची हवा खराब गटात होती. मात्र, सोमवारी दुपारी 3 वाजता मात्र शहराची हवा अतिखराब गटात गेली होती.
सफर ही संस्था शहरातील हवेची गुणवत्ता दर मिनिटाला मोजते. हेच काम महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळही करते व केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाला पाठवते. या दोन्ही संस्थांचा पुणे शहराबाबतचा अहवाल काळजीत टाकणारा आहे. त्यातही सफर संस्थेने हवेच्या गुणवत्तेसह शहरात अतिनील किरणांचा धोका वाढल्याचा इशारा दिला आहे. आजारी व्यक्तींनी उन्हात विनाकारण फिरू नये, असा सल्ला देण्यात आला आहे. शहरातील काही भागांत ओझोनचा थर विरळ झाल्याचा हा इशारा आहे.
हेही वाचा