Pune News : दिवाळी पाडव्याला अजित पवार गोविंदबागेत? | पुढारी

Pune News : दिवाळी पाडव्याला अजित पवार गोविंदबागेत?

बारामती : पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादीतील फुटीनंतर यंदाच्या शरद पवार यांचे निवासस्थान गोविंदबागेतील दिवाळी पाडव्याला उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार का? याबाबत बारामतीत सध्या उत्सुकता निर्माण झाली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी यापूर्वीच आम्ही दिवाळी एकत्रित साजरी करू, असे स्पष्ट केले आहे. परंतु, सध्याच्या राजकीय स्थितीत पवार कुटुंब खरेच एका व्यासपीठावर येतील का, याबद्दल साशंकता व्यक्त होत आहे.

बारामतीत शनिवारी (दि. 11) रोजी आयोजित शारदोत्सवात सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांचा कार्यक्रम पार पडला. या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे हे एकाच व्यासपीठावर आले. ज्येष्ठ नेते शरद पवार या वेळी उपस्थित नव्हते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यापूर्वीच आजारपणामुळे दिवाळीला भेटणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांना डेंग्यू झाल्यानंतर त्यांनी आजारपणामुळे आणखी काही दिवस विश्रांतीची गरज असल्याचे डॉक्टरांनी सांगितले असून, त्यानुसार यंदा दिवाळीला भेटणार नसल्याचे स्पष्ट केले. परंतु, त्यानंतर पवार कुटुंबीय पुण्यात एकत्र आले.

तेथून उपमुख्यमंत्री अजित पवार हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीसाठी दिल्लीला रवाना झाले होते. दिल्लीवरून ते पुन्हा बारामतीला आले. शारदोत्सवाला त्यांनी हजेरी लावली. परंतु, पाडव्याच्या मुख्य कार्?क्रमाला ते येतील का, याबद्दल सांशकता व्यक्त होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यालयाकडून याबाबत अधिकृतपणे कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही,परंतु उपलब्ध माहितीनुसार ते गोविंदबागेतील कार्यक्रमाला येणार नसल्याचे समजते.

दरम्यान, रविवारी बारामतीत खासदार सुप्रिया सुळे यांनी राजकीय भूमिका वेगळी व कुटुंब वेगळे, असे सांगितले. तत्पूर्वी त्यांनी आम्ही पवार कुटुंबीय एकत्र दिवाळी साजरी करू, असेही म्हटले होते. परंतु सध्याच्या राजकीय स्थितीत ते कितपत शक्य होते, याबद्दल सांशकता आहे. दर वर्षी दीपावली पाडव्याला ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे निवासस्थान असलेल्या गोविंदबागेत राज्यभरातून पदाधिकारी, कार्यकर्ते पवार कुटुंबीयांच्या भेटीसाठी येत असतात. ज्येष्ठ नेते शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, राजेंद्र पवार आमदार रोहित पवार आदी त्यांना भेटत असतात. यंदा अजित पवार यांच्याशिवाय दीपावली पाडवा पार पडेल, अशी चिन्हे आहेत.

कार्यक्रमाची मात्र जय्यत तयारी

दरम्यान, दर वर्षीच्या प्रथेनुसार गोविंदबागेत दीपावली पाडव्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. मंडप, व्यासपीठ उभारण्यात आले आहे. येथे येणार्‍यांसाठी फराळाचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

हेही वाचा

पंतप्रधानांच्या फॅक्टर्‍या कोणी कोणी पाहिल्या; राहुल गांधींचा सवाल

कोल्हापूर : काळम्मावाडी थेट पाईपलाईनमुळे वर्षाला 15 कोटींची बचत

Pune News : विरोधकांचे वकीलही शरद पवारांना बोलतात ‘सॉरी’

Back to top button