Pune News : कंत्राटी कामगारांची दिवाळी बोनसविनाच

Pune News : कंत्राटी कामगारांची दिवाळी बोनसविनाच

पुणे : पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या कंत्राटी कर्मचार्‍यांना दिवाळी बोनस देण्याचा आदेश कामगार आयुक्तालयाने दिला होता. आता दिवाळी सुरू झाली तरीही कंत्राटी कर्मचार्‍यांना बोनस मिळालेला नाही. त्यामुळे महापालिकेच्या ठेकेदारांनी कामगार आयुक्त आणि महापालिकेच्या आदेशाला केराची टोपली दाखवल्याचे स्पष्ट झाले आहे. महापालिकेमध्ये जवळपास अठरा ते एकोणीस हजार कर्मचारी कार्यरत आहेत. यामध्ये निम्मे म्हणजे 9500 कंत्राटी कर्मचारी आहेत.

महापालिकेच्या कायम कर्मचार्‍याला जसे दिवाळी बोनस आणि सानुग्रह अनुदान मिळते, तशाच प्रकारे महापालिकेच्या कंत्राटी कर्मचार्‍यांनाही दिवाळी बोनस आणि सानुग्रह अनुदान मिळावे, यासाठी अनेक दिवस महापालिकेसमोर कंत्राटी कर्मचारी व कंत्राटी सुरक्षारक्षकांचे आंदोलन सुरू होते. कंत्राटी कर्मचारी आणि कायम कर्मचारी समान काम करतात, त्यामुळे आम्हालाही बोनस मिळावा, अशी मागणी आंदोलकांची होती. कर्मचारी प्रतिनिधी आणि महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी यांच्यामध्ये चर्चाही झाली.

मात्र, कंत्राटी कर्मचार्‍यांची नेमणूक कंत्राटदाराने केली असून, त्यांना बोनस व सानुग्रह अनुदान देण्याची जबाबदारी त्यांचीच असल्याचे पालिकेने स्पष्ट केले होते. त्यानंतर हा विषय कामगार आयुक्तांकडे गेला होता. त्यानंतर महापालिकेच्या ठेकेदारांना बोनस प्रदान अधिनियम 1965 लागू आहे. त्यामुळे त्यांच्याकडून बोनस वितरित होणे आवश्यक आहे, असे आदेश सहायक कामगार आयुक्तांनी दिले होते. कामगार आयुक्त कार्यालयाने तसे पत्र महापालिकेला दिले होते.

त्यानंतर महापालिकेने संबंधित ठेकेदारांना बोनस देण्याचा आदेश दिला. कामगार आयुक्तांच्या आदेशानंतर आंदोलक कर्मचार्‍यांनी घोषणाबाजीसह गुलाल उधळून जल्लोष केला होता. कंत्राटी कर्मचार्‍यांना आणि सुरक्षारक्षकांना दिवाळी बोनस मिळालेला नाही. कंत्राटी सुरक्षारक्षकांचा पगार गुरुवारी, 9 नोव्हेंबर रोजी झाला आहे. बोनस देण्यासाठी संबंधित ठेकेदार महापालिकेकडे जास्तीची रक्कम मागत आहे. महापालिका निविदेतील रक्कम सोडून जास्तीची रक्कम देऊ शकत नाही. त्यामुळे कंत्राटी कामगारांची दिवाळी बोनसविनाच जाणार आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news