उत्‍सव : ज्ञानदीप उजळू दे!

उत्‍सव : ज्ञानदीप उजळू दे!

दिवाळी हा दिव्यांचा उत्सव.
प्रकाशोत्सव. घर आणि आसमंत पणत्या, आकाशकंदिलाच्या प्रकाशाने उजळवून टाकणारा काळ. भवताल प्रकाशमान होत असताना मनाचं आकाशही अधिक प्रकाशित होण्याची गरज आहे. दीपोत्सव साजरा केला की, अंधार नाहीसा होऊन समृद्धीचा प्रकाश येतो. दिवाळी साजरी करताना कोणीही उपेक्षित राहू नये, याची काळजी घेतली गेली पाहिजे. केवळ स्वत:च्या उपभोगासाठी खर्च करणं म्हणजे दिवाळी नव्हे, तर सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा हा सण आहे.

दिवाळी म्हणजे प्रकाशाचा उत्सव. अज्ञानाचा अंध:कार दूर होऊन ज्ञानाच्या प्रकाशाचे दिवे उजळावेत, हाच यामागचा उद्देश आहे. मुळात नात्यांचे दुवे जोडले जावेत, हा दिवाळी साजरी करण्यामागचा मुख्य उद्देश आहे. पण आज हे दुवे निखळत आहेत. नात्यांच्या वस्त्रांचे धागे दिवसेंदिवस अधिक विलग होऊ लागले आहेत. त्यामुळे नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो. या पार्श्वभूमीवर हा सण साजरा करण्यामागची भावना आपण लक्षात घेतली पाहिजे. दिवाळी हा मुख्यतः कृषिप्रधान सण आहे. प्रत्येकाच्या पदरी आनंदाचे चार क्षण टाकणारा सण. यावेळी शेतात पिकं आलेली असतात. त्याचा आनंद या निमित्ताने साजरा होतो. दिवाळी सुरू होते तेव्हा पावसाळा संपलेला असतो. पावसाळ्याच्या दिवसात वातावरणात एक प्रकारचा बुरसटलेपणा आलेला असतो. घरंही त्याला अपवाद नसतात. दिवाळीच्या निमित्ताने घरं स्वच्छ केली जातात. शेतात पिकं आल्याने या दिवसात शेतकर्‍यांच्या हातात पैसे असतात. त्यामुळेही दिवाळीचा आनंदोत्सव साजरा केला जातो. या आनंदामध्ये सगळ्यांना सहभागी होता यावं, अशी कल्पना त्यामागे होती. त्यामुळेच दिवाळीच्या दिवसांत घरी पाहुण्यांना बोलवावं अशी कल्पना पुढे आली. त्यांच्या स्वागतासाठी फराळाचे पदार्थ तयार केले जाऊ लागले.

या दिवसात लग्न झालेल्या मुलीला माहेरी बोलावण्याची पद्धत पूर्वी आपल्याकडे प्रचलित होती. मुलीबरोबरच तिच्या पतीलाही बोलावलं जायचं आणि त्याचा कपडे वगैरे वस्तू देऊन सन्मान केला जायचा. आपली मुलगी तिच्या सासरी सुखात नांदो, हीच भावना यामागे असायची. आजही अनेक ठिकाणी ही पद्धत अस्तित्वात आहे. पूर्वी आपल्याकडे बलुतेदारी पद्धत प्रचलित होती. हे बलुतेदार त्यांना वाटून दिलेली कामं करून गावकर्‍यांची मदत करत असत. त्यामुळे या बलुतेदारांना कपडे किंवा इतर भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान केला जात असे. बलुतेदार वर्ग हा निम्न आर्थिक गटातील असे. त्याला नवे कपडे घेऊन दिवाळी साजरी करणं शक्य होत नसे. त्यामुळेच त्यांना भेटी देण्याची पद्धत रूढ झाली असावी. थोडक्यात आपल्याप्रमाणेच समाजातील श्रमिक वर्गालाही दिवाळीचा आनंद घेता यावा हा उदात्त हेतू त्यामागे होता. समाजात एकजूट निर्माण करून 'आहे रे' वर्गाबरोबरच 'नाही रे' वर्गाच्या आयुष्यातही सुखानंदाचे मोती पेरण्याची ही भावना उल्लेखनीय आहे.

दिवाळीच्या काळात लक्ष्मीची पूजा केली जाते. लक्ष्मीला समृद्धीचं प्रतीक मानतात. तिची पूजा केली तर आपल्या घरात समृद्धी येईल, अशी भावना त्यामागे आहे. खरं तर लक्ष्मीची पूजा म्हणजे श्रमदेवतेचीच पूजा असते. सातत्याने श्रम करत राहिलं तर लक्ष्मी आपल्यापासून लांब राहात नाही, हा संदेश त्यामधून ध्वनित होतो. लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने सन्मार्गाने मिळवलेला पैसाच अधिक काळ टिकतो, असाही संदेश दिला जातो. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मी आपल्या घरात येते, अशी भारतीयांची श्रद्धा आहे. लोकसाहित्यातही या निमित्ताने अनेक लोकगीतांचा समावेश करण्यात आला आहे. 'लक्ष्मी येई घरा, ओटी तांदळांनी भरा' हे लोकगीत त्यापैकीच एक आहे. पूर्वी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी प्राण्यांचीही पूजा केली जात असे. गायी, म्हशी, बैल यासारखे प्राणी ही देखील आपली संपत्तीच आहे, अशी भावना त्यामागे होती. अजूनही काही ठिकाणी ही पद्धत आहे. विशेषत: विदर्भात अनेक ठिकाणी आजही लक्ष्मीपूजनाच्या दिवशी प्राणीपूजन केले जाते. यामध्ये असलेली भूतदया, प्राणीप्रेम महत्त्वाचे आहे.

विदर्भात दिवाळीच्या आधी येणार्‍या अष्टमीला आखी असं म्हटलं जातं. आखीच्या दिवशी गुराखी गुरांना ओवाळतो. यावेळी तो 'इडा टळो, पिडा टळो' अशी गाणी म्हणतो. शेतकर्‍यांच्या मनातील भीती दूर व्हावी, हा यामागचा उद्देश आहे. ज्ञानेश्वरांच्या पसायदानाचं जेवढं महत्त्व आहे, तेवढंच गुराख्यांच्या या प्रार्थनेलाही आहे. ज्ञानेश्वरांनी पसायदानातून विश्वाच्या कल्याणासाठी प्रार्थना केली. त्याचप्रमाणे हे गुराखी गावाच्या, गावातील गुरांच्या कल्याणासाठी प्रार्थना करत असतात. या निमित्ताने गुराख्यांना कपडे आणि इतर वस्तू देण्याची पद्धत पूर्वी होती. आता ती फारशी कोठे दिसत नाही.

विदर्भामध्ये दिवाळीच्या आधी झंडवाई नावाचा एक सण साजरा केला जातो. यावेळी पहिल्या दिवशी एक, दुसर्‍या दिवशी दोन, तिसर्‍या दिवशी तीन या क्रमाने दिवाळीपर्यंत दिवे लावले जातात. हा सण मातृपरंपरेचाच सण आहे. या दिवशी पहिल्या लेकीची पूजा करतात. लेकीची पूजा म्हणजे देवीचीच पूजा आहे, असं समजलं जातं. यावरून आपल्या संस्कृतीत स्त्रीशक्तीला किती महत्त्व होतं, हे दिसून येतं. दिवाळीला लग्न झालेली मुलगी माहेरी आली की मोठा आनंदोत्सव साजरा केला जात असे. पूर्वी विदर्भामध्ये पाडव्याच्या दिवशी गवळणी निघत असत. पुरुषच स्त्रियांचा वेश घेऊन गवळणी व्हायचे. यावेळी ते गावभर फिरून नाचून गाणी म्हणत असत. यातून लोकांचं मनोरंजन होत असे. गावकरी त्यांना बिदागी देत असत. याचवेळी वेगवेगळ्या ओव्या म्हटल्या जात असत. त्यामध्ये गुराख्यांच्या ओव्या, जात्यावरील ओव्या आणि भावा-बहिणीच्या प्रेमाच्या ओव्या यांचा समावेश असे. यामध्ये बहिणीच्या प्रेमाच्या ओव्या अधिक असत. दिवाळीच्या निमित्ताने बहिणीला माहेरी आणण्यासाठी भाऊ तिच्या घरी जात असे. यावेळी बहीण त्याच्यासाठी फराळ दडवून ठेवत असे. अशा प्रकारची वर्णनं त्या ओव्यांमध्ये असत. आमच्या आजीने अशा कितीतरी प्रकारच्या ओव्या मला सांगितल्या आहेत.

कितीही गरीब माणूस असला तरी तो आपल्या ऐपतीप्रमाणे दिवाळी साजरी करतो. या निमित्ताने घरं तर स्वच्छ होतातच; पण मनंही स्वच्छ होतात. किंबहुना मनं स्वच्छ व्हावीत, हाच त्यामागचा मुुख्य हेतू आहे. मनातल्या संकुचितपणाच्या भावना दूर होऊन त्याच्या कक्षा रुंदाव्यात ही दिवाळीसारख्या सणांमागची कल्पना आहे. पूर्वी दिवाळीच्या निमित्ताने गावात फिरणार्‍या गवळणींना बत्तासे, पानसुपारी वाटण्याची पद्धत होती. त्याचबरोबर या निमित्ताने स्त्रिया घराबाहेर पडत आणि गावातल्या ज्येष्ठ स्त्रियांना नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घेत. यामागे दडलेला नम्रतेचा भाव मला अधिक महत्त्वाचा वाटतो. मुळात, केवळ स्वत:च्या उपभोगासाठी खर्च करणं म्हणजे दिवाळी नव्हे हे लक्षात घेतलं पाहिजे.

दिवाळीच्या दिवसात विविध पदार्थ फराळासाठी केले जातात. रुचीपालट व्हावा, ही त्यामागची भूमिका. या निमित्ताने अनारसे, करंज्या असे पदार्थ तयार केले जातात. खेड्यापाड्यात करंज्यांना कान्होले म्हणतात. पूर्वी दिवाळीच्या दिवसांतच हे पदार्थ तयार केले जात असत. आता मात्र बाजारात हे पदार्थ केव्हाही तयार मिळतात. त्यामुळे त्याचे फारसे अप्रूप वाटत नाही; पण सणाच्या निमित्ताने ते खाण्यातली गंमत वेगळीच असते.

असा हा सर्वांना आनंद देणारा सण. घर आणि आसमंत पणत्या, आकाशकंदिलाच्या प्रकाशाने उजळवून टाकणारा. आसमंत प्रकाशित करताना मनाचं आकाश प्रकाशित होण्याची गरज आहे. तसे झाल्यास समृद्धीचा प्रकाश पसरेल आणि या समृद्धीने सणाचा आनंद द्विगुणित व्हावा, ही कल्पना त्यामागे आहे. दिवाळी साजरी करताना कोणीही उपेक्षित राहू नये, याची काळजी घेतली गेली पाहिजे. कारण सर्वांना बरोबर घेऊन जाणारा हा सण आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news